अभिनेता रितेश देशमुख आणि रवी जाधव यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासोबत काढलेल्या सेल्फीवरून शिवभक्त नाराज झाल्यानंतर याप्रकरणात रितेशने माफी मागितली आहे. फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमधून त्याने सर्व शिवभक्तांची माफी मागताना कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नसल्याचे सांगितले. तसेच आमच्या चुकीमुळे कोणी दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागत असल्याचे म्हटले आहे.

रितेशने लिहिलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, ‘आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मी ही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो.’  पुढे या पोस्टमध्ये तो म्हणतो की, महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. आजन्म ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. त्याप्रमाणे आम्ही तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंतःकरणपूर्वक माफी मागतो.’

या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी रितेशला पाठिंबा दाखवला असून अजाणतेपणे झालेल्या चुकीसाठी शिवभक्तांनी रितेशला आणि त्याच्या सहकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करावे असे मत व्यक्त केले आहे.

काय आहे हे प्रकरण…

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. या सिनेमाचे शुटिंगही सुरु झाल्याचे समजते. मात्र या सिनेमाच्या टीमने नुकतीच स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाला काल म्हणजेच ५ जून रोजी दिलेली भेट वादात सापडली आहे. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत काढलेल्या सेल्फीमुळे शिवभक्त दोघांवर चांगलेच संतापले. त्यामुळेच रितेशने ट्विट केलेले फोटो डिलीट केले.

या भेटीत रितेशबरोबर रवी जाधव, ऐतिहासिक कांदबरीकार विश्वास पाटील आणि टीममधील इतर सहकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी काढलेले काही फोटो रितेशने पहाटेच्या सुमारास ट्विट केले. हे ट्विट रवी जाधव यांनीही रिट्वीट करुन आपल्या प्रोफाइलवर पीन केले. मात्र या फोटोंवर शिवप्रेमी चांगलेच संतापले.

रितेशने ट्विटरवर रायगड भेटीचे तीन फोटो ट्विट केले होते. यापैकी एका फोटोत रितेश आणि रवी जाधव यांनी रायगडावरील मचाणीवर असलेल्या महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासोबत काढलेला सेल्फी होता. तर दुसऱ्या फोटोत संपूर्ण टीम महाराजांचे सिंहासन आहे तेथील मचाणीवर चढून रांगेत बसल्याचे दिसत होते.

दुसऱ्या फोटोत संपूर्ण टीम महाराजांचे सिंहासन आहे तेथील मचाणीवर चढून रांगेत बसल्याचे दिसत होते.

तिसऱ्या फोटोमध्ये हीच टीम मागे धुके असून गडाच्या कठड्याजवळ उभी असल्याचे दिसते. अगदी रात्री केलेल्या या ट्विटवर सकाळपर्यंत अनेकांनी आक्षेप नोंदवला. ज्या चरणांवर सर्व शिवभक्त आपले मस्तक टेकवतात तेथे जाऊन फोटो काढण्याची काय गरज होती असा सवाल करत शिवभक्तांनी आपला आक्षेप नोंदवला.

रवी जाधव यांनी कोट केलेले रितेशचे ट्विट… रितेशने हे ट्विट डिलीट केले आहे.

महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याबरोबर काढलेला हा फोटो चुकीचे असल्याचे मत अनेकांनी नोंदवले. अशाप्रकारच्या अनेक कमेन्ट आल्यानंतर अखेर रितेशने मराठीमधील ते ट्विट काढून टाकले. सध्या त्याच्या ट्विटर अकाऊण्टवर या भेटीसंदर्भातील केवळ इंग्रजीमधील ट्विट दिसत आहे. या ट्विटमध्ये रितेश म्हणतो की, आज सकाळी मराठा सम्राज्याची राजधानी असलेल्या रायगडाची भेट घेतली. श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतात जन्मलेल्या सर्वात महान योद्धांपैकी एक आहेत. माहराजांच्या मुर्तीसमोर नतमस्तक होऊन घेतलेला आशिर्वाद तुम्हाला सशक्त बनवतो.’ रितेशने या मजकूरासह महाराजांच्या चरणावर नतमस्तक होताना आणि भगव्या झेंड्याबरोबरचा स्वत:चा फोटो ट्विट केला आहे. या ट्विटला हजारोच्या संख्येने लाइक्स आणि रिट्वीट मिळाले आहेत.

रितेशने मराठीमधील ट्विट काढून टाकले असले तरी काहीजणांनी ते फोटो समाजमध्यमांवर पोस्ट करत या तिघांवर टिका केली. तर काहींनी कमीत कमी पाटील यांनी तरी इतरांना फोटो काढताना समज द्यायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावरच रितेशने हा माफीनामा पोस्ट केला आहे.