लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. सुजय विखे-पाटील यांनी साकळाई पाणी योजनेच्या मुद्द्यांवर मते मागितली होती. परंतु निवडणुकीनंतर त्यांनी हा विषय सोडून दिला. दरम्यान, मतांच्या राजकारणासाठी सुजय विखेंनी साकळाई योजनेचा निवडणुकीपुरता वापर करून फसवणुक केल्याचा आरोप अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला. अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

दरम्यान, साकळाई पाणी योजनेच्या मुद्द्यावर दीपाली सय्यद 9 ऑगस्टपासून उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. सुजय विखे-पाटील यांनी साकळाई पाणी योजनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांनीही साकळाई योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु निवडणुकीनंतर मुख्यमंत्री आणि विखे-पाटील या दोघांनाही त्याचा विसर पडल्याचे सय्यद म्हणाल्या.

दरम्यान, या विरोधात 9 ऑगस्ट क्रांतीदिनापासून जिल्हा परिषदेसमोर श्रीगोंदा तालुक्यातील सर्व ग्रामस्थांसह आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी दीपाली सय्यद यांनी दिला. दरम्यान, त्यांच्या या आरोपांनंतर डॉ. सुजय विखे-पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.