अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी MeToo प्रकरणी अन्य व्यक्तीमार्फत आमच्याकडे अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर नाना पाटेकर यांना महिला आयोगाने नोटीस पाठवली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण पाठविले होते. तनुश्री दत्ता यांनी महिला आयोगासमोर येणे गरजेचे होते. मात्र, आतापर्यंत त्या महिला आयोगासमोर आल्याच नाहीत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

तनुश्री दत्ता यांच्याकडून आम्हाला त्या प्रकरणाविषयी माहिती जाणून घ्यायची होती, असेही रहाटकर यावेळी म्हणाल्या. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तनुश्री दत्ता यांनी MeToo प्रकरणावर आक्षेप नोंदवले आहेत. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.

अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी MeToo प्रकरणी सिने अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव घेतल्यानंतर सिनेसृष्टीत मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हादेखील दाखल झाला होता. त्यानंतर सिनेसृष्टीमधील अनेकांची प्रकरणे बाहेर आली. तर याच दरम्यान तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या प्रकरणावर काय निर्णय लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. असे असतानाच पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लिन चीट दिली. त्यानंतर तनुश्री दत्ता यांनी नाना पाटेकर यांनी राजकीय दबाव वापरुन क्लिन चिट मिळविल्याचा आरोप केला होता. त्यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.