News Flash

कोयता घेऊन ऊसतोडणीला जाणारे गाव ऊस पिकवू लागले

आदर्श गाव प्रकल्पामुळे वंजारवाडीचे रुपडे पालटले

बीड जिल्ह्यातील वंजारवाडी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने किराणा माल विक्रीचे दुकान सुरू करण्यात आले आहे.

वसंत मुंडे

वंजारवाडीत काही वर्षांपूर्वी पुजेलाही उसाचं टिपरू मिळत नव्हते, तिथे आता चारशे एकरवर ऊस पिकतो. गावातील नदीवर सतरा बंधारे, रस्त्यांसह सार्वजनिक सुविधांचा विकास करत सरपंच वैजीनाथ तांदळे आणि सर्जेराव तांदळे यांनी गावाला नवाच चेहरा दिला आहे.  माफक दरात पिठाची गिरणीचा प्रयोग केल्यानंतर ग्रामपंचायतीने लोककल्याणासाठी किराणा दुकानही सुरू केले आहे.  वंजारवाडी गावाने विकासवाटेवर टाकलेले हे पाऊल पुढे नेणारे असल्याचा दावा गावकरी करू लागले आहेत.  हे गाव आता ‘आत्मनिर्भरतेचे’ आदर्श म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या गावाचा कायापालट आता पहावयास मिळत आहे. कोयता घेऊन ऊसतोडीला जाणारे हात आता ऊस पिकवू लागले आहेत.

बीड शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील डोंगर कपारीतील वंजारवाडी हे तीन हजार लोकसंख्येचे गाव. तीस वर्षांपूर्वी प्रस्थापित व्यवस्थेविरुध्द याच गावातून राजकीय परिवर्तनाची ठिणगी पडली आणि गावाची ओळख ‘संघर्षशील गाव’ अशीच झाली. राजकीय परिवर्तनात अनेक ‘प्रयोग’ गावावर झाले मात्र सार्वजनिक विकासापासून मात्र दूर राहिले. सरपंच वैजीनाथ तांदळे व सर्जेराव तांदळे यांनी गावचा कारभार हाती घेतल्यानंतर ‘राजकीय संघर्षां’ तही गावच्या विकासाला गती दिली. भौतिक विकासाबरोबरच ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांच्या गरजा माफक दरात गावातच भागाव्यात यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवून गावाला राज्यातले ‘आदर्श गाव’ केले आहे. गावचा कारभार हाती आला की, कुटुंबापुरत्याच विकासाची अनेक उदाहरणे गावोगावी अनुभवयाला येतात. पण तांदळे बंधूंनी नागरिकांच्या गरजा माफक दरात गावातच भागल्या पाहिजेत या उद्देशाने ग्रामपंचायतच्या वतीने पिठाची गिरणी सुरू केली. यात मसाला, मिरची पावडर, मिनी दालमिल, शेंगा फोडण्याची मशीन अशा प्रकारच्या सुविधा दिल्या. तर लोककल्याणकारी किराणा दुकानातून गावातच माफक दरात साहित्य उपलब्ध करत दोन्ही व्यवसायाची सुत्रे  महिलांच्या हाती दिली.

राज्यात ग्रामपंचायतीच्या वतीने पिठाची गिरणी आणि किराणा दुकान चालवणारी अपवादात्मक गावांच्या यादीत वंजारवाडी गेली आहे. राजकीय पाठबळाशिवाय संघर्ष करत तांदळे बंधूंनी काही वर्षांत गावचा चेहरा बदलला. दरवर्षी दीडशेपेक्षा जास्त बैलगाडय़ा ऊसतोडणीला जात तर उन्हाळ्यात टँकरवरच भिस्त. गावात जायलाही रस्ता नीट नाही, इतर सुविधांची तर अबाळच. अशा परिस्थितीत वैजीनाथ तांदळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून गावच्या नदीवर तब्बल सतरा बंधारे उभारल्याने तीनशे एकर जमीन ओलिताखाली आली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. काही वर्षांपूर्वी पुजेलाही उसाचं टिपरू मिळत नव्हतं. तिथे चारशे एकरवर ऊस उभा राहिल्याने बहुतांशी ऊसतोडणी कामगारांच्या हातातील कोयता कमी झाला.

दुष्काळात तलावातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवली आणि ८० शेतकऱ्यांची खडकाळ जमीन सुपीक झाली. पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र तीन मोठय़ा टाक्या उभारून वस्त्यांवरही पाण्याची सोय केली. शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने प्रत्येक घरातून सरकारी नोकरदार निर्माण झाल्याने गावातील घरांचे चित्रही बदलले. लोकांच्या विश्वासाने तांदळे बंधूंनी गावाला आता स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. काळाच्या ओघात कालबा झालेल्या रुढी, परंपरा बदलल्या. गावात मातंग समाजासह इतर सर्व समाजाच्या पंगती एकत्र करून सामाजिक समानतेचे पहिले पाऊल टाकले. या रुढी बदलण्याचा वैजीनाथ यांना खूप त्रासही सहन करावा लागला. तर मृत व्यक्तीचा दहावा पन्नास किलोमीटर अंतरावरील राक्षसभुवन येथे करण्याची परंपरा खर्चिक आणि धोक्याची असल्याने तांदळे बंधूंनी स्वत:च्या वडिलांचा दहावा गावात करून ही परंपरा बदलली. यामुळे सामान्य कुटुंबाचा आर्थिक ताण कमी झाला. तर गावातून पोलीस ठाण्यात तक्रार जाणार नाही याकडे लक्ष देऊन गाव तंटामुक्तही केले आहे.

जिल्हा परिषद शाळेला डिजिटल केले. तर गावाला जोडणारे आठ किलोमीटरचे रस्ते पक्के केले. गाव अंतर्गत दोन किलोमीटरचे सिमेंट रस्ते आणि वस्तीला जोडणारे साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यांनाही निधी खेचून आणला. गावात एक हजार वृक्षांचे रोपण करून झाडांना ठिबक सिंचनाव्दारे पाणी देण्याची सोय केल्याने झाडे आता डोलू लागली आहेत. छोटय़ा सहा मंदिरांचा जीर्णोध्दार करून संत भगवानबाबा यांचे सहा हजार स्क्वे. फुटाचे आणि दोनशे मीटर उंचीवर दगडी मंदिर उभारल्याने माफक दरात गावातील लग्न आणि इतर समारंभांसाठी त्याचा उपयोग केला जातो. गावातील जुन्या दगडी वाडय़ांचे दगड मंदिरासाठी वापरले आणि रस्ते मोठे केले. यामुळे गावाचा चेहराच बदलला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 12:19 am

Web Title: adarsh gaon project changed the face of vanjarwadi abn 97
Next Stories
1 हिंगोलीतील जलसंधारणाच्या ६३ कामांवरील स्थगिती उठवली
2 राज्यात सौरऊर्जेवरील पहिली सूतगिरणी परभणीत
3 कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले – राम कदम
Just Now!
X