व्यसनाधीन भावाला धडा शिकवण्यासाठी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मृताच्या मोठय़ा भावाला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
थोरल्या भावाच्या मारहाणीत लक्ष्मण गणपत गुठळे (वय २८) याचा मृत्यू झाला. याबाबत संतोष गणपत गुठळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की लक्ष्मण गुठळे हा व्यसनाच्या आहारी गेला होता. याच कारणाने त्याची बायकोही माहेरी निघून गेली होती. तो आईसह घरात सर्वांनाच त्रास देत असे, त्यांना शिवीगाळ, मारहाणही करीत असे. रविवारी रात्री असाच प्रकार घडल्याने संतोष याने लक्ष्मणला धडा शिकविण्यासाठी मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र जखमेचे गांभीर्य लक्षात न आल्याने लक्ष्मणला शेजारच्या खोलीत ठेवण्यात आले. सकाळी त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे लक्ष्मणला दाखल करून न घेतल्याने पुन्हा घरी नेण्यात आले व दुपारी त्यास गंभीर मारहाण झाल्याचे पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
याप्रकरणी नतेवाइकांकडून गुन्हा दाखल करण्यास अंत्यविधीचे कारण सांगून चालढकल होत असल्याचे लक्षात येताच सहायक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी स्वत: फिर्याद दाखल केली. मंगळवारी रात्री पोलिसांनी संतोष यास पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्याने कुणीतरी आपल्या भावाला मारहाण करुन घरासमोर आणून टाकल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अनेक दुव्यांचा अभ्यास करून संतोषला बोलता केल्यावर वरील हकिगत समोर आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.