शहरात रुग्ण वाढीचे सत्र कायम आहे. १४ नवीन रुग्णांची शुक्रवारी भर पडली. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण रुग्णसंख्या ७२६ वर पोहोचली. आतापर्यंत ३४ जणांचे मृत्यू झाले आहेत. सध्या १८७ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला शहरात वेगवेगळय़ा भागात रुग्ण आढळून येत आहेत. आज आणखी १४ रुग्णांची नोंद झाली. जिल्हय़ातील एकूण ८९ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ७५ अहवाल नकारात्मक, तर १४ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. एकूण रुग्णसंख्या तब्बल ७२६ झाली. आज सकाळच्या अहवालानुसार १४ नवे करोनाबाधित आढळून आले. त्या रुग्णांमध्ये पुरुष व महिला प्रत्येकी सात आहेत. यामध्ये गुलजारपुरा, सिंधी कॅम्प, हैदरपुरा येथील प्रत्येकी दोन, तर गोरक्षण रोड, गवळीपुरा, पातूर, बिर्ला कॉलनी, अकोट फैल, बैदपुरा, जुने शहर, मोहता मिल येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार एकही सकारात्मक रुग्ण आढळून आला नाही. ६१ अहवाल नकारात्मक आले. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्यात येत आहेत. शहरात आरोग्य तपासणीच्या मोहिमेने वेग घेतला आहे.

आतापर्यंत ५१०९ नमुने नकारात्मक

अकोला शहरासह जिल्हय़ात करोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नकारात्मक अहवाल येण्याचे प्रमाणही मोठे आहे. आतापर्यंत नकारात्मक अहवालांची एकूण संख्या ५१०९, तर सकारात्मक अहवाल आलेल्या एकूण रुग्णांची ७२६ आहे. अकोल्यात विषाणू संशोधन व तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यापासून नमुन्यांच्या चाचणीचे निदान लवकर होत आहे.

आमदार शर्माकडून परिस्थितीचा आढावा

आमदार गोवर्धन शर्मा यांनी आज प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी करून करोनाची बाधा झालेल्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या. भानपुरा, गुलजारपुरा, सावंतवाडी, रणपिसे नगर, साईनगर, डाबकी रोड, अकोट फैल, माळीपुरा, गायत्रीनगर, विठ्ठल मंदिर परिसर, जवाहरनगर, बैदपुरा या भागांमध्ये जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

‘डिस्चार्ज’च्या संख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला

अकोला जिल्हय़ात करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असली तरी उपचाराअंती करोनावर मात करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ मिळालेल्यांच्या संख्येने आज पाचशेचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत ५०५ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी सोडलेल्या १७ जणांचाही समावेश आहे. त्यातील सात जणांना घरी, तर १० जणांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवण्यात आले. अकोल्यात करोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ६९.५५ टक्के आहे.