निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरण

पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शहरात दाखल झालेल्या गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह काही कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली.
न्यायालयीन आदेशानंतर एका प्रकरणात सादरे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर ते नाशिक येथे त्यांच्या निवासस्थानी राहावयास आले होते. मागील महिन्यात त्यांनी घरातच आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वाळू ठेकेदार, काही राजकीय मंडळींकडून देण्यात आलेल्या त्रासाचा उल्लेख केला होता. त्यामुळे सादरे आत्महत्या प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आली होती. शुक्रवारी गुन्हे अन्वेषणचे पथक शहरात दाखल झाले. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, विभागीय पोलीस अधिकारी के. डी. पाटील यांच्या पथकाने काही कागदपत्रे ताब्यात घेतली. उपनिरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. जोपर्यंत सर्व तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणतीही माहिती देता येणार नसल्याचे पथकाने स्पष्ट केले.