यावर्षी शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये म्हणून खरीप हंगामासाठी ७३ हजार ८०० मेट्रिक टन खताचे आवंटन करण्यात आले आहे. त्यात ८ हजार १०६ मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध झाला असून १८ हजार ४०१ मेट्रिक टन इतर खतांचा साठा आहे. खतांच्या काळाबाजारावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर पथक तयार केले असून परवाना तात्काळ रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांची बियाणे व खत घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात एक कक्ष सुरू राहणार असून तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. संबंधित नियंत्रण कक्षाने त्यांच्या कार्यक्षेत्रात खरीप हंगामातील सोयाबीनच्या बियाण्यांची उपलब्धता, त्याचे समान वितरण, शेतकऱ्यांकडे मागील वर्षांतील चांगल्या प्रतीच्या उपलब्ध सोयाबीनबाबत माहिती संकलित करण्यासह शेतकऱ्यांशी संपर्कात राहून अर्धवेळ गुणनियंत्रकांना नमुने काढावे लागणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता कशी होईल, यादृष्टीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. यासंदर्भात सविस्तर अहवाल आठवडय़ातून एकदा सादर करावा लागणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिली.
जिल्ह्य़ात सोयाबीनचा काळाबाजार होत असल्याचे लक्षात आल्यास संबंधित नियंत्रण कक्षाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मागील काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढले असल्यामुळे सोयाबीन बियाण्यांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरूवातीला कंपन्यांकडून बियाणे येत असले, तरी काही कृषी केंद्र संचालकांकडून कृत्रिम टंचाई भासवली जाते. परिणामी, शेतकऱ्यांना जादा रक्कम मोजून बियाणे खरेदी करावे लागतात. जवळपास दोन महिन्यांपासून तयार केलेली शेतजमीन पडित राहू नये, यासाठी बळीराजाचा बियाणे मिळविण्यासाठी आटापिटा सुरू असतो. काही शेतकरी जुने बियाणे वापरत असले, तरी बाजारात आलेले प्रमाणित बियाणे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठय़ा प्रमाणात असतो. ही बाब हेरून कृषी केंद्र संचालकांकडून कृत्रिम टंचाई भासवून शेतकऱ्यांना नागवले जाते, परंतु यंदा सोयाबीन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून यावर काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बियाण्यांच्या बाबतीत दरवर्षीच कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याने ऐनवेळी शेतकऱ्यांना चढय़ा भावाने बियाण्यांची खरेदी करावी लागते.
प्रशासनाकडून हा काळाबाजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी व्यापारी अक्षरश: शेतकऱ्यांची लूट करीत असतात. मात्र, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी आयुक्तालयाने दिलेल्या निर्देशानुसार यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाणार आहे. या माध्यमातून कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोयाबीन बियाण्यांच्या काळाबाजारावर नजर रोखून बसणार आहे.
जिल्हास्तरीय १ व तालुकास्तरीय १५, असे एकूण १६ सोयाबीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागील वर्षांतील चांगल्या प्रतीच्या उपलब्ध सोयाबीन बियाण्यांबाबत माहिती संकलित केली असता शेतकऱ्यांकडे ४ हजार ३१६.५० क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदा जिल्ह्य़ासाठी ८२ हजार २७५ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची आवश्यकता असून विविध कंपन्यांचे बियाणे बाजारात आले आहे, परंतु शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेल्या बियाणांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले.