विशेष साहाय्य योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड जोडण्याचे आवाहन
आधार कार्डाची सक्ती करता येणार नाही असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरी शासनाच्या विविध योजनांसाठी आधार कार्डाची सक्ती सुरूच आहे. केंद्र शासनाच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीबीटी) प्रकल्पामध्ये नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम (एनएसएपी) मधील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/ श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तियोजना या योजनांचा समावेश आहे. या योजनेच्या लाभासाठी आधारकार्ड जोडणे आवश्यक असल्याचे प्रसिद्धिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.
(एनएसएपी) या योजनांमधील लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाचे ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत डिजिटलाइज यादीमधील १०० टक्के आधार क्रमांकाचे सिडिंग करण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने वरील योजनेतून लाभ घेत असलेल्या ज्या लाभार्थ्यांनी स्वत:चे आधार कार्ड अद्याप अलिबाग तहसील कार्यालयाकडे सादर केले नसतील अशा लाभार्थ्यांनी तात्काळ २८ डिसेंबर २०१५ पूर्वी स्वत:च्या आधार कार्डची साक्षांकित प्रत तहसील कार्यालय, अलिबाग या कार्यालयास सादर करावी.
वरील योजनेतून लाभ घेत असलेल्या ज्या लाभार्थ्यांनी फक्त आधार कार्ड काढल्याची पावती सादर केली आहे अशा लाभार्थ्यांनी आधार कार्ड प्राप्त झाले असल्यास आधार कार्डची साक्षांकित प्रत २८ डिसेंबर २०१५ पूर्वी तहसील कार्यालय, अलिबाग (संजय गांधी योजना शाखा) या कार्यालयात सादर करावी. अद्याप आधार कार्ड प्राप्त झाले नसल्यास पुन:श्च आधार कार्ड काढून त्याची पावती तात्काळ सादर करावी.
वरील योजनेतून लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांमध्ये जे लाभार्थी आधार कार्ड काढण्यास असमर्थ आहेत अशा लाभार्थ्यांच्या नातेवाईक/ शेजारी यांनी त्या गावच्या तलाठी/ मंडळ अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा व अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यास तलाठी/ मंडळ अधिकारी यांना सहकार्य करावे असे तहसीलदार, अलिबाग यांनी एका प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.