पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेची मर्यादा संपण्यासाठी काही तास शिल्लक असताना येथील श्रमकरी महिलांनी अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अधिक महिना सुरु असल्याचे निमित्त साधत जावायांना लेकींसह धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जावई आले आणि सासूबाईंनी त्यांना श्रमदान करण्यास सांगितले. श्रमदान केल्यानंतर जावयांनी जेवणावर ताव मारला. या दुर्मिळ योगामुळे जावईदेखील खूश झाले. या विशेष उपक्रमामुळे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील व्हरकटवाडी गावाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमुळे पाण्यासाठी वणवण भटकणारे गावकरी आता निश्चिंत झाले आहेत. गेल्या वर्षी केलेलं वॉटर कप स्पर्धेच काम हे लाख मोलाच ठरलं आहे. बीड जिल्ह्यातील व्हरकटवाडी या गावाने गत वर्षी तालुक्यात दुसरा क्रमांक पटकवला होता. यावर्षी देखील स्पर्धेचे काम जोमाने सुरू आहे. यानिमित्ताने जावायांनी चक्क सासुरवाडीला येऊन वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान केले आहे. गावकऱ्यांनी यावर्षी श्रमदान आणि जेसीबी मशिनद्वारे कामे करत येणाऱ्या पावसाळ्यातील पावसाचे पाणी शिवारातच मुरवण्याचे नियोजन केल आहे. या गावातील नागरीक कायमच वेगवेगळ्या संकल्पना राबवत खेळीमेळीच्या वातावरणात श्रमदान केले आहे. या स्पर्धेची मुदत येत्या २२ मे रोजी संपणार आहे.

गावातील काही महिलांनी पुढाकार घेत श्रमदान सुरू असलेल्या डोंगराच्या माथ्यावर गावातील दहा लेकीं आणि जावयांना धोंडे जेवणाचा बेत आखला होता. लेकी जावयांसह गावातील श्रमदान करणाऱ्यांनी या ठिकाणी धोंडे जेवणाचा आस्वाद घेत श्रमदान केले. श्रमदानास करण्यासाठी गावातून सुमारे तीनशेच्या जवळपास महिला, पुरुष सहभागी झाले होते. या श्रमदानाची शोभा दहा लेकींनी जावयासह उपस्थिती लावत वाढवली. गेल्या वर्षी कोळपिंपरी या गावाने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता, तर व्हरकटवाडीने दुसरा क्रमांक मिळवला होता. त्यामुळे यावर्षी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.