अजान सुरु झाल्यानंतर भाषण थांबवल्यामुळे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. औरंगाबाद येथे एका कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे यांनी अजान सुरु होताच महापौर नंदकुमार घोडले यांना भाषण थांबवण्यास सांगितलं. आपले आजोबा बाळासाहेब ठाकरे यांनीच आपल्याला ही शिकवण दिली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्व आमची राष्ट्रीयता आहे. माझे आजोबा बाळासाहेब ठाकरेंकडून आम्हाला अजान सुरु असताना भाषण न करण्याची शिकवण मिळाली आहे, म्हणूनच मी महापौरांचं भाषण थांबवलं असं सांगितलं.

आदित्य ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये शहर बस वाहतूक सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर नंदकुमार घोडले यांचं भाषण सुरु होतं. यावेळी अजान सुरु झालं असता आदित्य ठाकरे यांनी त्यांना भाषण थांबवण्यास सांगितलं.