नागपूर : गेले दोन आठवडय़ांपासून नाणार, दूधदर आदी प्रश्नांवरून विरोधकांसोबत फरफटत चाललेल्या शिवसेनेत आज चैतन्याची हवा भरली ती शिवसेनेचे नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी. ठाकरे यांचे विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत आगमन होताच आक्रमक झालेल्या शिवसेना आमदारांनी आज प्रथमच आपला सैनिकी बाणा दाखविण्याचा प्रयत्न केला. सेनेची विशेषत: मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी कामकाजात दाखविलेल्या सक्रीय सहभागाला विरोधकांबरोबरच खुद्द मुख्यमंत्र्यानीही दाद दिली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील शिवसेना आमदारांच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आज विधिमंडळात उपस्थित होते. ठाकरे यांनी विधानसभेच्या गॅलरीतून आपल्या पक्षाच्या आमदारांच्या कामगिरीचे निरीक्षण केले. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार नीलम गोऱ्हे यांच्यासह सेनेचे काही पदाधिकारीही होते. युवा सेनाप्रमुखांना पाहताच सेनेच्या आमदारांनी अनेक प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण सभागृहात मांडण्यात आले. त्यावर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी भुजबळ यांच्या संदर्भात झालेल्या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची मागणी केली. त्याच अनुषंगाने शिवसेनेचे नागेश पाटील-आष्टेकर आणि राजेश क्षीरसागर व अन्य आमदारांना झालेल्या मारहाणीचा तसेच त्यांच्या अवमानाचा मुद्दाही उपस्थित केला. त्यावर भलतेच आक्रमन झालेल्या सेना आमदारांनी या प्रकरणात सरकारने तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मुंबईतील विमानतळ परिसरातील झोपडय़ांच्या प्रश्नावरूनही सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यावर प्रश्नांचा भडीमार केला. मग शिवसेना आमदारांची ही आक्रमकता विरोधकांच्या नजरेतून कशी सुटणार. प्रभू यांची कामकाजातील आजची आक्रमकता हेरत अजित पवार यांनी प्रभू यांना नाव न घेता त्यांना  जोरदार टोला लगावला. अजित पवार म्हणाले की आज युवा नेतृत्व आल्यामुळे सभागृहात प्रश्नांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यावर ‘सब प्रभू की लिला है’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना दाद दिली आणि सभागृहात हशा पिकला.