सिंधुदुर्गात पंचतारांकित पर्यटन केंद्रासाठी ताजला भाडेपट्टय़ाने जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यासाठी ताज ग्रुपच्या मे. इंडियन हॉटेल्स कंपनीला ५४.४० हेक्टर जमीन ९० वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टय़ाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पहिले पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना याबद्दल आभार मानले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथे ताज ग्रुपच्या हॉटेल स्थापनेसंदर्भात पर्यटन विभागाचा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल मी मंत्रिमंडळाचे आभार मानतो. जवळपास २२ वर्षांपासून हा प्रस्ताव रखडलेला होता परंतु महाविकास आघाडी सरकारने तो मंजूर करून घेतला. कोकणातल्या या सुंदर हॉटेलच्या स्थापनेमुळे कोकणातील नैसर्गिक सौंदर्याशी सुसंगत अशा शाश्वत पर्यटन आणि शाश्वत विकासामध्ये भर पडण्यासाठी मदत होणार आहे”.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भूसंपादित केलेली जमीन दीर्घ भाडेपट्टय़ाने इंडियन हॉटेल्स कंपनीला देण्यात येणार आहे.