शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे, तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायची आहे. माफी ही गुन्हेगाराला दिली जाते. शेतकरी गुन्हेगार नाहीत. त्यांना कर्जमुक्त करणार, असे आश्वासन शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले.

जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने शुक्रवारी दुपारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे यांच्या उपस्थितीत विजय संकल्प मेळावा झाला. यात त्यांनी शेतकऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेना नेहमीच अन्यायाविरुध्द रस्त्यावर उतरते. जनता तिच्यासोबत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला जनतेने भरभरुन मतदान केले. त्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी राज्यभर जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. ही यात्रा निवडणुकीसाठी नव्हे, तर तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आहे. येणाऱ्या निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. धुळे जिल्हा रुग्णालयाची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे कळले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. येत्या १५ दिवसात ही समस्या सोडवून शहरातील रुग्णालय ते सुरु करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

खा. संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांना धुळ्यातून आशीर्वाद मिळत असल्याचा एकिकडे आनंद, तर धुळ्यात महादुष्काळ असल्याचे चित्र पाहून वाईट वाटते, असे सांगितले. धुळ्याचे हे संकट शिवसेनाच दूर करेल. जिथे जिथे ही यात्रा जाईल, तिथे शिवसेनाच असेल. राज्यातील सत्ता सुत्रे शिवसेनेच्या हाती राहतील. केंद्रात तुम्ही आणि राज्यात आम्ही असे आमचे ठरले आहे. असे विधान करीत राऊत यांनी भाजपसोबत मुख्यमंत्रिपदासह सत्ता वाटपाच्या मुद्यावर भूमिका मांडली. आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची संपूर्ण सत्ता नसतांनाही धुळ्यातील जनतेने आदित्य ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी केलेली गर्दी अभूतपूर्व असल्याचे सांगितले. आमचे धुळे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी एक लाख २५ हजार वह्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना वाटप करण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

जंगी स्वागत आणि विद्यार्थ्यांशी संवाद

आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा शुक्रवारी सकाळी धुळ्यात आली. शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोटरसायकल फेरी काढत स्वागत केले. यानंतर जयहिंद महाविद्यालयात आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांंशी संवाद साधला. त्यांनी विविध प्रश्नांवर मनमोकळेपणे उत्तरे दिली. बेरोजगारी हटविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. शेतकरी कर्जमुक्ती, महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक प्रश्न यासह विविध मुद्यांवर ठाकरे यांनी संवाद साधला.