15 October 2019

News Flash

ऐन थंडीत विद्यार्थ्यांची गार पाण्याने आंघोळ

जिल्ह्यातील ५५ आश्रमशाळांमध्ये ८४ सौरबंब असून सर्वच सौरबंब बंद अवस्थेत आहेत.

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना थंडीत कुडकडत आंघोळ करावी लागते. काही आश्रमशाळांतील सौरबंबाचे पॅनला गोदामा धूळ खात पडलेले आहे.

आदिवासी आश्रमशाळांतील सौरबंब बंद असल्याचा फटका; देखभाल-दुरुस्तीकडे शासकीय दुर्लक्ष

हेमेंद्र पाटील, बोईसर

पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरवत असल्याचा दावा जरी शासनाकडून केला जात असला तरी येथे भीषण परिस्थिती आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना आंघोळीस गरम पाणी मिळावे यासाठी सौरबंब (सोलर वॉटर हिटर) बसवण्यत आले, मात्र सर्वच सौरबंब नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत थंडगार पाण्याने आंघोळ करावी लागत आहे.

पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू प्रकल्पांतर्गत ५५ आश्रमशाळा असून त्यापैकी २१ अनुदानित तर ३४ शासकीय आश्रमशाळा आहेत. जव्हार प्रकल्पामध्ये ४८ आश्रमशाळा असून त्यापैकी ३० शासकीय आश्रमशाळा तर १८ अनुदानित आश्रमशाळा आहेत.  तेथील विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी सर्वच आश्रमशाळांमध्ये सौरबंब लावण्यात आले. मात्र शासकीय दुर्लक्षामुळे या सौरबंबांची दुरवस्था झाली आहे.

जिल्ह्यातील ५५ आश्रमशाळांमध्ये ८४ सौरबंब असून सर्वच सौरबंब बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत नळाखाली थंड पाण्यात आंघोळ करावी लागत आहे. डहाणू प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बेटेगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. खुटल येथील विद्यार्थ्यांना तर नदीच्या साचलेल्या पाण्यात आंघोळ करावी लागत आहे. आश्रमशाळांच्या विकासासाठी शासनाकडून कोटय़वधींचा निधी येत असतानाही सौरबंबाच्या दुरवस्थेकडे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

बेटेगाव येथील पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांंशी याबाबत संपर्क साधला असता, आम्हाला ५.३० वाजता आंघोळ करावी लागते. गरम पाणी कधीच मिळत नाही, थंड पाण्यानेच आंघोळ करावी लागते, असे त्यांनी सांगितले. आश्रमशाळा अधीक्षकांना याबाबत विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिली. आश्रमशाळेतील सौरबंब बंद असल्याने विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

त्रुटी काय?

’ बेटेगाव, नानीवली, खुटल येथील आश्रमशाळांतील सौरबंब बंद अवस्थेत आहेत. खुटल येथे आणलेले सौरबंब बंद पडल्याने सोलर पॅनल गोदामात धूळ खात पडून आहे.

’ थंडगार पाण्याने आंघोळ करत असल्याने सर्दी, ताप या आजारांना मुलांना सामोरे जावे लागते. शिक्षक दुचाकीवरून आजारी मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेतात.

’ आश्रमशाळांतील सौरबंब कुठलीही मागणी न करता नागपूर आयुक्त कार्यालयामार्फत पाठवण्यात आले होते. त्यानंतर आश्रमशाळांमध्ये ते लावण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र काही आश्रमशाळांमध्ये ते कार्यान्वित झाले नाहीत. जिथे कार्यान्वित करण्यात आले, तिथे ते काही महिन्यांतच बंद पडले.

’ तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर काही आश्रमशाळांमधील सौरबंब दुरुस्त करण्यात आले होते. मात्र सध्या ते पुन्हा बंद पडले आहे.

येथील आश्रमशाळांची पहाटे पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. लहानग्या मुलांना थंडगार पाण्याने आंघोळ करावी लागते हे राज्याचे दुर्दैव आहे. कोटय़वधी रुपये खर्च दाखवून सौरबंब खरेदी केले, मात्र ते दर्जाहीन घेण्यात आल्याने खरेदीत गैरव्यवहार झाला आहे. आदिवासी विकास विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित मुलांना आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करावी. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. -जगदीश धोडी, उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ

सौरबंब बिघडल्याने मुलांना थंड पाण्यानेच आंघोळ करावी लागते. याबाबत वरिष्ठांना कळवण्यात आले आहे.
-अर्जुन मोहनकर, अधीक्षक, बेटेगाव आश्रमशाळा

जव्हार आणि डहाणू प्रकल्पांतर्गत असलेल्या आश्रमशाळांतील जे सौरबंब नादुरुस्त आहेत, ते दुरुस्त करण्यात येणार आहे. जे सौरबंब दुरुस्ती करण्यासारखे नाहीत, त्या ठिकाणी नवीन विद्युत बंब बसवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. खासगी संस्थेसोबत करार करून नवीन लावण्यात येणाऱ्या विद्युत बंबांची देखभाल-दुरुस्ती ठेवली जाणार आहे. – संजय मीना, अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे

First Published on January 12, 2019 1:42 am

Web Title: adivasi ashram school students taking bath of cold water