परभणीकर शिवसेनेवर अतोनात प्रेम करतात व निष्ठेने शिवसेनेला मतदान करतात. पण निवडून येणारा पुढे शेण खातो, असा संदर्भ देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या मातीशी व मातेशी गद्दारी करणार नाही, अशी शपथ घेण्याचे फर्मान उमेदवार आमदार संजय जाधव यांना सोडले. त्याप्रमाणे जनसमुदायासमोर हात उंचावून ‘आपला जन्म भगव्यात झाला. शेवटही भगव्यातच होईल,’ अशी शपथ जाधव यांनी घेतली.
महायुतीचे उमेदवार जाधव यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची येथे जाहीर सभा झाली. व्यासपीठावर सेनेचे गटनेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख रवींद्र मिल्रेकर, आमदार मीरा रेंगे, भाजप प्रदेश सरचिटणीस विजय गव्हाणे, सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, अर्जुन खोतकर, आमदार संतोष सांबरे, बबनराव लोणीकर, शिवाजी चोथे, मिलिंद नार्वेकर, अॅड. गौतम भालेराव, सुरेश बंडगर, माणिक कदम आदी उपस्थित होते.
शिवसेना हा समुद्र आहे. गळतीवर आपला पक्ष मोठा होईल, असे शरद पवारांना वाटत असेल तर घ्या आमचे चार-दोन थेंब. पवारांच्या पक्षाचा जन्मच गद्दारीतून झाला आहे. त्यांना निष्ठा काय कळणार, असा प्रश्न उपस्थित करून पवारांचा पक्ष आधीच ‘इनोव्हा’ होता, आता सायकल पार्टी होईल. झालेच तर डबलसीट नाही तर एकला चलो रे, अशी या पक्षाची गत होईल, अशी टीकाही त्यांनी केली.
सोनिया गांधी शाही इमामकडे मतांची भीक मागतात. तुमची ‘धर्मनिरपेक्ष’ मते आम्हाला द्या, असे साकडे घालतात. मुस्लिमांची मते धर्मनिरपेक्ष, मग िहदूंची मते किडय़ा-गांडुळांची आहेत काय, असा सवाल ठाकरे यांनी विचारला. िहदुत्वाबद्दल बोलणे गुन्हा असेल तर आम्हाला त्याची पर्वा नाही, असेही ते म्हणाले. अन्याय सहन करण्याची क्षमता शिवसनिकात नाही. सेनेत नामर्दाना थारा नाही. ज्यांना फुटायचे आहे त्यांनी फुटावे, नसता लाथ घालून बाहेर काढले जाईल. शिवसेना नेभळटांची नाही. शिवसेनेत सर्व वाघांचे बच्चे आहेत, असे सांगून एमआयएमचे खासदार ओवेसी यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली.  
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवारांशी वैयक्तिक दुश्मनी नाही, ते वयाने मोठे आहेत. तुमचा अपमान करावा असेही वाटत नाही. पण संताप येतो, असे सांगून पवारांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, असे ते म्हणाले. युतीचे राज्य आल्यास गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल. शिवसनिकांचा विश्वास आहे, तोवर पक्षप्रमुख राहू, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
देसाई, गव्हाणे, दळणर, खोतकर, अॅड. भालेराव, बंडगर, कदम आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी केले. आसाराम बोराडे यांनी आभार मानले. सभेला प्रचंड गर्दी जमली होती. सभेपूर्वी काही वेळ पाऊस आला.