सांगली : सांगली जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थात्मक अलगीकरण करण्याचे प्रशासनाने स्थळ निश्चित केले असून या ठिकाणी सदर प्रवाशांचे स्वखर्चाने अलगीकरण करण्यात येईल. यासाठी अशा प्रवाशांनी उपविभागीय अधिकारी मिरज व पोलीस प्रशासन यांच्याशी स्वतहून संपर्क साधावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी जाहीर केली आहे. यामुळे परदेशात अडकलेले विविध कामानिमित्त गेलेले नागरिक, परदेशात नोकरी करणारे भारतीय नागरिक, विद्यार्थी यांना त्यांचा तेथील रहिवास लांबल्याने अनेक जण भारतात येण्यासाठी प्रयत्नशील होते. अशांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांनी आरोग्याचे सर्व नियम काटेकोर पाळणे अनिवार्य असून यामध्ये मास्क वापरणे, पर्यावरणीय स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, हातांची स्वच्छता आदींचा समावेश आहे. विमानतळावर उतरल्यानंतर सर्वाचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार असून यात  ज्यांना करोना सदृश्य लक्षणे आढळतील त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचाराखाली ठेवण्यात येईल. तर उर्वरित प्रवाशांना त्यांच्या स्वतच्या जिल्ह्यात १४ दिवस संस्थात्मक अलगीकरण करण्यात येईल. १४ दिवसांनंतर करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना स्वतच्या घरी पाठविण्यात येईल, असे करताना त्यांनी पुढील १४ दिवस स्वतच्या आरोग्याची स्वत निरीक्षणाची हमी देणे आवश्यक आहे. असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

त्यानुसार सांगली जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यासाठी स्थळनिश्चिती केली असून या ठिकाणी सदर प्रवासी स्वखर्चाने संस्थात्मक अलगीकरण करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली असून जे विद्यार्थी संस्थात्मक अलगीकरणची प्रक्रिया पूर्ण न करता स्वत:च्या थेट घरी जातील, अशा विद्यार्थ्यांची माहिती स्थानिक लोकांनी तत्काळ प्रशासनास द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.