पालघर शहरात अनधिकृत फलकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; कर बुडीत

पालघर : पालघर शहराच्या आवारामध्ये बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याकडे नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने जाहिरात करापोटी मिळणारे उत्पन्न बुडीत खात्यात जात आहे.  शहरात सुमारे ४० बेकायदा जाहिरात फलक दिमाखात उभे असल्याचे दिसत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर जाहिरात फलक लावण्यासाठी  पाच वर्षांचा ठेका एका ठेकेदाराला देण्यात आला आहे. त्याअंतर्गत  झाई-रेवस-रेड्डी मार्गावर अनेक ठिकाणी पालघर तालुक्यात ७० ते ८० फलक लावण्यात आले आहेत.  सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगर परिषदेने या ठिकाणांची पाहणी करून हे फलक लावण्यास परवानगी दिली आहे.

असे असतानाही पालघर शहराच्या हद्दीत काही मंडळींनी ३० ठिकाणी बेकायदा जाहिरात फलक उभ केलेले दिसून येत आहेत. यामध्ये  वाढदिवस तसेच राजकीय स्वरूपाचे फलक झळकताना दिसतात.  त्याला राजकीय मंडळींचा आशीर्वाद असल्याचा अंदाज बांधला जात आहे. अशा फलक उभारणीदरम्यान  वादळीवाऱ्यांमुळे फलक खाली पडून काही दुर्घटना घडली तर कोणाला जबाबदार धरायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या संदर्भात नगर परिषदेकडे विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहिरात फलकांकरिता नगर परिषदेने तीन वर्षांसाठी स्वतंत्र निविदा काढली होती. मात्र संबंधित ठेकेदारांचे कंत्राट तांत्रिक कारणांमुळे एक वर्षांनंतर रद्द करण्यात आले. ठेकेदारांना ज्या ठिकाणी फलक लावले होते  त्या  ठिकाणी आता अनेकदा बेकायदा फलक उभारण्यात येत आहेत. मध्यंतरी अनेकांवर दंडात्मक कारवाई केल्याचे सांगण्यात येते.  सद्यस्थितीत उभारण्यात आलेल्या ४० बेकायदा जाहिरात फलकांचा समावेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेक्यात समावेश करायचा की, स्वतंत्र ठेका द्यायचा याबाबत नगर परिषदेकडून निर्णय अपेक्षित आहे.

याबाबत नगर परिषद प्रशासनाला विचारले असता कारवाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली.  उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांची पाहणी करून बेकायदा फलक आढळून आल्यास  जाहिरातदाराविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे  पालघर नागर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, मध्यंतरी पालघरमध्ये असलेल्या अशाच एक  ठिकाणी उभारण्यात आलेल्या फलकावर  पालकमंत्री दादा भुसे यांच्याबाबत वादग्रस्त विधान फलकावर प्रसिद्ध  केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्ते आक्रमक झाले होते. वेळीच तो फलक उतरवण्यात आल्याने कोणताची अनुचित प्रकार घडला नाही. हा फलकही बेकायदा  लावण्यात आल्याचे उघडकीस आले होते.