संतोष मासोळे

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्राणवायूसाठी धावपळ सुरू असून विमानाने आणि रेल्वेने प्राणवायू वाहून नेण्याची वेळ आली आहे. देशाची राजधानी प्राणवायूअभावी हादरली आहे. अशा वैद्यकीय आणीबाणीच्या काळात धुळे शहर आणि जिल्ह्यात प्राणवायू उत्पादनासाठी जिल्हा प्रशासनासह राजकीय नेते आणि उद्योजक पुढे आल्याने प्राणवायू निर्मितीत धुळ्याची आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

धुळे जिल्ह्यात मार्च, एप्रिल महिन्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले. त्यामुळे शासकीय, खासगी अशी सर्वच रुग्णालये, करोना केंद्रे भरली आणि रुग्णांना प्राणवायूयुक्त खाट मिळविण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली.  इतर जिल्ह््यांत प्राणवायूची मागणी जशी वाढली, तशी धुळ्यातही टंचाई जाणवू लागली. धुळ्यातील एकमेव शासकीय करोना रुग्णालयात असलेल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय आवारात गेल्या वर्षी १३ किलोलिटर क्षमतेची टाकीउभारण्यात आली होती. २४ तासांत ही टाकीही संपत असल्याने प्राणवायू पुरवठा सुरळीत ठेवण्याची मोठी कसरत करावी लागली. त्यातच ग्रामीण भागातील रुग्णवाढीमुळे शिंदखेडा, दोंडाईचा, साक्री, शिरपूर येथील करोना केंद्रात प्राणवायूची मागणी वाढत गेली. अशा स्थितीत प्राणवायूचा तुटवडा वाढत गेला. इतर जिल्ह््यांतून पुरवठा मिळवणे कठीण जात आहे. या स्थितीत जिल्ह्यातच द्रवरूप प्राणवायू निर्मिती करण्याचा आणि हवेतून प्राणवायू मिळविण्याचा पर्याय जिल्हा प्रशासनाने मुख्यत्वे निवडला. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी यासाठी पुढाकार घेतला. आरोग्य विभाग, खासगी रुग्णालये, उद्योजक यांच्या बैठका घेत त्यांनी प्राणवायू निर्मितीसाठी आत्मनिर्भर होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

चाळीस लाखांची देणगी

जिल्हाधिकारी यादव यांच्या आवाहनास शिरपूरचे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी प्रतिसाद दिला. पटेल परिवाराने ४० लाख रुपयांची देणगी देत शिरपूर येथील करोना केंद्रासाठी हवेतून प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प युद्धपातळीवर उभारला. तसाच प्रयोग धुळ्यात जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांच्या केशरानंद रुग्णालयाने यशस्वीपणे साकारला. त्यापाठोपाठ धुळ्याचे आमदार फारुक शाह यांनी आपल्या मालकीची १० हजार चौरस फूट जागा आणि ८० लाख रुपयांचा आमदार निधी प्राणवायू निर्मिती प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे अध्यक्ष असलेल्या संजय सोया उद्योग समूहानेही धुळे जिल्हा रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे. याविषयीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हा प्रकल्प करोनाबाधितांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.

धुळे पालिकेचे प्रयत्न

धुळे महापालिका प्रशासनानेही प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त अजिज शेख यांनी तांत्रिक माहिती जाणून घेत प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. धुळे महापालिकेच्या रुग्णालयात प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. महापालिकेचे स्वत:चे रुग्णालय नाही. त्यामुळे मनपाने साक्री रस्त्यावरील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत करोना काळजी केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यावर चर्चा झाली. या प्रकल्पातून सुमारे ३० ते ३२ मोठे सिलिंडर प्राणवायू निर्मिती होऊ  शकेल, अशी माहिती देण्यात आली आहे. एकू णच धुळ्यात पुढील काळात करोनाबाधितांसाठी प्राणवायूची कमतरता भासणार नाही, अशी तयारी प्रगतिपथावर आहे.

खासगी रुग्णालयातही प्रकल्प

राज्य सरकारने खासगी रुग्णालयांनी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारावे, अशी सूचना केली आहे. त्यानुसार धुळे शहरातील केशरानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वर भामरे आणि डॉ. महेंद्र बोरसे यांनी हवेतून प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले. आठ दिवसांत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पातून रोज ६० सिलिंडर प्राणवायू मिळेल, अशी माहिती ज्ञानेश्वर भामरे यांनी दिली.

‘एमआयएम’च्या आमदाराचा पुढाकार

धुळे शहराचे आमदार फारुक शाह यांनी स्वत:च्या मालकीची जागा आणि आमदार निधीतील ८० लाख रुपये प्राणवायू प्रकल्प निर्मितीसाठी उपलब्ध करीत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी संजय यादव यांना दिले. तसेच करोनाबाधितांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करावे यासाठी २० लाखांचा निधी दिला. एमआयएमचे आमदार असलेल्या शहा यांच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत झाल्यानंतर जुन्याजाणत्या लोकप्रतिनिधींनाही जाग आली. त्यांनीही आता प्राणवायूसाठी निधी देण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.