|| दिगंबर शिंदे, लोकसत्ता

करोनामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम झाले असून, त्यावर योग्य आणि वेळेत उपचाराची गरज असल्याने मानसिक आजारावर उपचारासाठी सांगलीत जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे.

राज्यात पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला. यानंतर राज्य शासनाने १५ मार्चपासून महाविद्यालये बंद करण्याची घोषणा केली. मात्र जिल्ह्य़ात त्याच वेळी प्राथमिक शाळाही बंद राहतील अशी घोषणा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली होती. पुण्या-मुंबईमध्ये रुग्ण आढळून येत असतानाच पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा इस्लामपूरला चार रुग्ण सापडले.
मार्चपासून जिल्हा करोनाशी लढत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व येथील शुश्रूषा मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेने हाती घेतलेल्या हेल्पलाइनवर रोज १००हून अधिक कोविड रुग्णांशी मानसोपचारतज्ज्ञांशी संवाद होत आहे. तर १५ हजार नागरिकांचे समाजमाध्यमाद्वारे मानसिक स्वास्थ्यविषयक प्रबोधन सुरू असल्याची माहिती मानसोपचारतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिली.

तीन हजार व्यक्तींचे सर्वेक्षण

करोनामुळे नागरिकांध्ये कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक प्रश्न निर्माण होत आहेत, यातून निर्माण झालेल्या ताण-तणावांना सामोरे जाता येत नसल्याने साजातील सर्व स्वास्थ्य हरवत असल्याचे सिद्ध झाले आहे, इस्लमपूर येथील शुश्रूषा मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेने एप्रिल, जून महिन्यातील टाळेबंदीत ९०८५ कुटुंबातील मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या २८५६ व्यक्तींचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात भीती, अकारण काळजी ५५ टक्के, चिंता व ताणतणाव ४१ टक्के, अस्वस्थता, उदासीनता ६२ टक्के चिडचिडेपणा ८५ टक्के तर एकाकीपणा सहन न होणे अशा तक्रारी ४६ टक्के व्यक्तींमध्ये दिसून आल्या आहेत.याशिवाय झोप, भुकेच्या तक्रारी, नकारात्कम विचार, मानसिक थकवा अशा बाबी तज्ज्ञांच्या निदर्शनास आल्या आहेत. शुश्रूषा संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर केला.

मदतीसाठी विशेष अभियान

शुश्रूषाने सादर केलेल्या अहवालाची जिल्हा प्रशासनाने व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दखल घेऊन करोनाशी लढण्याचे विशेष अभियान सुरू केले. लोकांची करोनाविषयीची अकारण भीती, निराशा, ताणतणावातून घडणाऱ्या आत्महत्या यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर एका आठवडय़ामध्ये तीनशेहून अधिक लोकांनी मदतीची मागणी केली आहे. आजार, मृत्यूची भीती, झोपेच्या तक्रारी, कुटुंबीयांच्या भविष्याची काळजी, आर्थिक ताण अशा समस्यांवर रोज १००हून अधिक लोकांना समुपदेशन केले जात आहे.

करोनाने अनेक जवळची, नात्यातील माणसं दुरावली. बऱ्याच वेळा मनावर झालेला परिणाम धड सांगताही येत नाही. अशा वेळी रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच वैद्यकीय उपचारांची गरज आहे. शुश्रूषा संस्थेमार्फत हाच सकारात्मक विचार पोहोचविण्याचे प्रयत्न आहेत.  – कालिदास पाटील, इस्लामपूर

मानसिक रुग्ण आपणास कोणता आजार झाल्याचे प्राथमिक पातळीवर मान्य करीत नाही इथेच मोठा धोका आहे. हा धोका ओळखून कुटुंबीयांनी तातडीने मानसिक समुपदेशनासाठी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. समस्यांच्या मुळाशी गेले तर सुदृढ समाजासाठी ते उत्तम ठरू शकते. – प्रा. भानुदास पवार, मानसोपचारतज्ज्ञ.
करोनाने महिलांच्या मानसिकतेवरदेखील आघात केलाच आहे. विशेषत: भीती, नैराश्य, कौटुंबिक समस्येमुळे निर्माण होणारे प्रश्न, यातून महिलांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. मुलांच्या शैक्षणिक अनिश्चिततेमुळे दडपण आणि भीती वाढली आहे. यातून कुटुंबीयांकडून आधार मिळण्याची गरज आहे.    – अर्चना मुळे, संवाद समुपदेशन केंद्र, सांगली.