भूजल पातळी समाधानकारक असल्याचा प्रशासकीय अहवाल

पालघर : पालघर जिल्ह्य़ात अधिकांश तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाली असली तरीही जिल्ह्य़ातील विविध तालुक्यांतील सरासरी भूजल पातळी गेल्या पाच वर्षांच्या सरासरीनुसार समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. तलासरी तालुक्यात भूजल पातळी इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक खोलीवर असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्य़ातील ५४ विहिरींच्या निरीक्षणाच्या आधारे वेगवेगळ्या तालुक्यांतील भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. जानेवारीअखेरीस या विहिरींच्या जलपातळीचे निरीक्षण केल्यानंतर प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये

५४ पैकी २७ विहिरींच्या भूजल पातळीत एक मीटरपेक्षा कमी घट, तर १७ विहिरींमध्ये एक ते दोन मीटर इतकी घट झाल्याचे दिसून आले आहे. या उलट जिल्ह्य़ातील १० विहिरींच्या भूजल पातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

गेल्या दहा वर्षांत या विहिरींच्या सरासरी पातळीचा अभ्यास केल्यानंतर तलासरी तालुक्यांतील विहिरींची पातळी ०.१८ मीटर इतकी खालावली असून त्याची झळ नागरिकांना पोहोचत आहे.

भूजल पातळीच्या अभ्यासाच्या निकषाच्या आधारे तलासरी तालुक्यात सौम्य स्वरूपात भूजल पातळीमध्ये परिणाम झाला असल्याचे दिसून आले आहे.

 

तालुका  भूजल पातळीची

खोली (मीटरमध्ये)

डहाणू                ५.३०

जव्हार                ४.३९

मोखाडा           ३.२३

पालघर             ३.९०

तलासरी           ५.५४

वाडा                 ३.९१

वसई              ३.०५

विक्रमगड       २.२०