राखीव ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढविली
बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील कलम १२चे उपकलम-१ मधील खंड व कनुसार विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक वगळून) शाळांमध्ये प्रवेशस्तर वर्गात बालकांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्यात आलेले आहेत. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्य़ामधील ८ तालुक्यातील ३९ शाळांमधील विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक वगळून) इयत्ता पहिलीसाठी ३७९ व पूर्वप्राथमिकसाठी १८ अशा एकूण ३९७ राखीव जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी इच्छुक पालक अर्जदारांनी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाइटवर दिनांक २६ एप्रिल २०१६ पासून ते दिनांक २५ मे २०१६ पर्यंत बालकांचे अर्ज भरण्यासाठी आवाहन केले होते. सदरची ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत दिनांक ३१ मे २०१६ पर्यंत वाढविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे कार्यालय, तसेच सर्व शिक्षा अभियान कार्यालय, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्रमांक ०२३६६-२२८८६६ येथे संपर्क साधावा.