सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेबाबत प्रलंबित कामे पूर्ण करून प्रवेश प्रकियेस ताबडतोबीने मंजुरी द्यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा कोणताही पहाणी दौरा झालेला नाही. त्याअभावीच प्रवेश प्रक्रिया प्रलंबित राहिलीय. त्यामुळे त्याची पहाणी करून त्यासाठी अत्यावश्यक अंतिम परवानगी तातडीने द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे केली आहे.

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी खासदार पाटील दिल्लीत आहेत. यावेळी सातारा वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात खासदार पाटील यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीय यांची काल भेट घेतली. त्यावेळी खासदार पाटील म्हणाले, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४९५ कोटींचा भरीव निधी व ६२ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. मंजूर जागेवर इमारत बांधली जाणार आहे.

मात्र, तोपर्यंत त्यांची प्रवेश प्रक्रिया रखडू नये, महाविद्यालय प्रत्यक्ष सुरु व्हावे यासाठी तात्पुरत्या स्वरूपात साताऱ्यात तयार असलेल्या पर्यायी इमारतीत कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल शैक्षणिकदृष्ट्या लागणाऱ्या पायाभूत सुविधा राज्य शासनाने उपलब्ध दिल्या आहेत. तेथे १०० एमबीबीएस विद्यार्थ्यांची पहिली तुकडी शैक्षणिक वर्ष २०२१ पासून सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी लेक्चर रूम, स्किल लॅब आणि सेंट्रल रिसर्च लॅबसह चार प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररीसह केंद्रीय ग्रंथालय, मुला-मुलींसाठी वसतिगृह सुविधा, खेळाचे मैदान व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याशिवाय राज्य सरकारने केंद्रीय प्रयोगशाळेच्या सर्व सुविधा, पॅथॉलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्रासाठी क्लिनिकल बायोकेमिस्ट्री लॅबसह हॉस्पिटल कॅम्पसमध्ये अतिरिक्त लेक्चर थिएटरसह प्रयोगशाळेसाठी १३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा कोणताही पहाणी दौरा झाल्यास प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यातील अडचणी दूर होऊ शकतील असे खासदार पाटील यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे केली.