दुधात भेसळ करण्याच्या हेतूने सुमारे एक लाख रुपये किमतीच्या सााहित्याचा साठा बाळगून त्याचा वापर दुधात भेसळ करताना आढळून आलेल्या सहाजणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी पकडले. पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे दर्लिग दूध संकलन केंद्रात ही कारवाई करण्यात आली.
राजेंद्र तुकाराम चव्हाण, धनाजी वसंत कोळी (दोघे रा. उपरी, ता. पंढरपूर), शामराव भाऊसाहेब रांगोळे (रा. सांगली), दत्तात्रेय मुरलीधर शिंदे, दरिबा भीमा गायकवाड (दोघे रा. आंबे) व दत्ता कसरे (रा. पापनस, ता. माढा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दत्तात्रेय मुरलीधर शिंदे यांच्या मालकीचे आंबे येथे दलिर्ंग दूध संकलन केंद्र असून याठिकाणी दुधात भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पंढरपूर तालुका पोलिसांनी या दूध संकलन केंद्रावर धाड घातली असता  त्यात तीनशे लिटर तेलाचे चार बॅरल, १५ किलो पामतेलाचे डबे व तीनशे लिटर दूध सापडले. तसेच ‘टॉल’ नावाचे रसायन आढळून आले. या सर्व साहित्याचा वापर दुधात भेसळ करण्यासाठी होत असताना दिसून आला. नैसर्गिक दुधाचा दर्जा बदलून त्यात भेसळयुक्त व शरीरास अपायकारक तथा असुरक्षित पदार्थ मिसळून त्याचे फॅट व डिग्री वाढवून प्रचलित दराने दुधाची विक्री केली जात होती. याप्रकरणी अन्नसुरक्षा कायदा व भारतीय दंड विधान कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम पुढील तपास करीत आहेत