समाजातील कुप्रथांविरुद्ध बंड करून मानवी हक्कांसाठी संघर्ष करणारे अॅड. एकनाथ आवाड यांच्यावर तेलगावजवळील नेल्सन मंडेला वसाहत परिसरात मंगळवारी शोकाकुल वातावरणात बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नी, दोन मुली व मुलाने एकत्रितपणे आवाड यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार केले. जाती व्यवस्थेने जगण्याचा हक्क नाकारलेल्या वर्गासाठी आयुष्यभर लढा उभारणाऱ्या ‘जिजां’ना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून चळवळीतील कार्यकत्रे, नेत्यांसह पुरुष, महिला आबालवृद्ध मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अॅड. आवाड यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तेलगाव येथील नेल्सन मंडेला वसाहतीत राज्यभरातील कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. आबालवृद्ध महिला धाय मोकलून आक्रोश करीत होत्या. जाती व्यवस्थेने गावकुसाबाहेर फेकलेल्या, कर्मकांडात अडकलेल्या दलित समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी आवाड यांनी उभे आयुष्य खर्ची घातले. राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केल्याने त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास मंडेला वसाहतीतून अंत्ययात्रा निघाली आणि समोरच्या शेतामध्ये बौद्ध पद्धतीने आवाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जोगेंद्र कवाडे, आर. टी. देशमुख व विवेक पंडित, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी आमदार लक्ष्मण माने, राधाकृष्ण होके पाटील, पृथ्वीराज साठे, प्रा. सुशीला मोराळे, कॉ. नामदेव चव्हाण, गौतम भालेराव, सुषमा अंधारे, सरोजिनी पंडित, बाबुराव पोटभरे, पप्पू कागदे आदींनी श्रद्धांजली वाहिली.
महिलांनी दिला खांदा
परिवर्तनवादी अॅड. एकनाथ आवाड यांच्या पाíथवाला महिलांनी खांदा दिला. परंपरेनुसार पाíथवाला पुरुषच खांदा देतात. मात्र, ‘जीजां’च्या अखेरच्या प्रवासाला महिलांनी खांदा देऊन अनिष्ट प्रथांच्या विरोधातील चळवळ चालू ठेवण्याचा संदेश यातून दिला.