प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

लातूर : देशातील ४६ टक्के जनता दारिद्रय़रेषेखाली असताना आर्थिक मंदी येतेच कशी? आर्थिक मंदी ही या देशातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओढवून घेण्यात आली आहे, असा आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. रविवारी सायंकाळी लातूर येथे ते सभेत बोलत होते. व्यासपीठावर अ‍ॅड. अण्णाराव पाटील, संतोष सूर्यवंशी, नवनाथ पडळकर, यशपाल भिंगे, राजा मणियार, अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे उपस्थित होते.

या देशातील गरीब माणसाने सत्तेकडे पाहू नये म्हणून जाणीवपूर्वक मंदी आणण्यात आली आहे. नवे विकत घेणारा वर्ग निर्माण केला तरच अर्थव्यवस्था उत्तम चालते. आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकार पावलेच उचलत नाही. महाराष्ट्रात एकीकडे ओला दुष्काळ तर दुसरीकडे कोरडा दुष्काळ आहे. ओल्या प्रदेशातील पाणी कोरडय़ा प्रदेशात आणता येते. मात्र, सरकार याबाबतीत गंभीर नाही. कापूस उत्पादक शेतकरीही सरकारच्या धोरणामुळे अडचणीत येणार आहे. कारण अमेरिकेतून आलेला कापूस चार हजार रुपये क्विंटलने भारतात उपलब्ध होतो आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची हमी आपण घेत असल्याचे आंबेडकर म्हणाले.

यापूर्वी बँका ठेवीदाराच्या पशांची हमी देत असत. आता परिस्थिती बदलली असून बँका बुडाल्या तरी तुमची कितीही रकमेची ठेव असली तरी त्यातील फक्त एक लाख रुपयांची हमी घ्यायला बँका तयार आहेत. गेल्या ७० वषार्ंत देशात असा निर्णय झालेला नव्हता, कारण तेव्हा देशात विरोधी पक्ष होता. आता देशातील विरोधी पक्ष संपवून टाकण्याचे काम भाजपाने सुरू केले असल्याचा आरोप त्यांनी केला.

अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांनी नागपूरपासून  सुरू झालेल्या सत्तासंपादन रॅलीला मिळत असलेल्या प्रतिसादाची माहिती सभेत दिली. या वेळी लातूरचा आमदार वंचित बहुजन विकास आघाडीचाच असेल, असा विश्वास राजा मणियार यांनी व्यक्त केला. संतोष सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकात लातूरचे आमदार जनतेसाठी नाही, तर स्वत:च्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे मत व्यक्त केले.