दिल्लीसह चार राज्यांत भाजपला यश मिळालेले असतानाही शनिवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आघाडीचा सूर आळवला. राजकारणासह सर्वच क्षेत्रांत अस्पृश्यता वाईटच, असे सांगत राजकारणही त्याला अपवाद नाही, असे ते म्हणाले. आपल्या विधानाला आधार देण्यासाठी बिहारमध्ये सत्ता स्थापन करताना कम्युनिस्टांना जनसंघाने पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले.
येथे आयोजित जायन्टस् क्लबच्या ३९व्या वार्षकि अधिवेशनात अडवाणी बोलत होते. जायन्टस्चे अध्यक्ष नाना चुडासामा, शायना एन. सी., खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा यांची उपस्थिती होती.
‘राजकीय बातमी देणार नाही,’ असे स्पष्ट करीत अडवाणी यांनी भाषणाला सुरुवात केली. कोणत्याही क्षेत्रात अस्पृश्यता असूच नये, क्षेत्र सामाजिक असो किंवा राजकीय, असे त्यांनी सांगितले. औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे विद्यापीठ असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात अस्पृश्यता हे पाप आहे, तसेच अन्य क्षेत्रातही आहे. मतभेद असतातच, ते व्यक्तही करता येतात. मात्र, कोणाला तरी वगळून राजकारण करता येत नाही. केवळ दलितच नाही तर मुस्लीम समाजही यात गृहीत धरायला हवा. त्यांनी औरंगाबाद शहरात डॉ. रफिक झकेरिया यांनी केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला.
गेल्या काही दिवसांत जनरेटा व स्वयंसेवी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे संसद आणि सरकारवर परिणाम झाले आहेत. निर्भयावरील बलात्कारानंतर व्यक्त झालेला जनतेचा राग तीव्र होता. अशाच प्रकारच्या रोषातून माहितीचा अधिकार आणि जनलोकपाल ही विधेयके मंजूर झाली. त्याचे श्रेय अण्णा हजारे यांना द्यावे लागेल, असेही अडवाणी यांनी सांगितले. केवळ सरकारकडून सर्व काही होईल असे न मानता समाजात चांगले घडावे, या साठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वयंसेवी संस्थांचा रेटा आता वाढल्याचे मान्य करीत नीतिमूल्ये वाढविताना भावना व बुद्धिमत्ता यांचा संबंध लक्षात घ्यावा लागतो. पण विचारात आध्यात्मिक सूत्र असणारी माणसेच जगात मान्यताप्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. नाना चुडासामा चांगले राजकीय व्यंग्य भाष्यकार आहेत. ते मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हॉटेलच्या फलकावर ज्या पद्धतीने भाष्य करीत, त्यावरून ते पहिले ट्विटर असावेत. हल्ली ब्लॉगच अधिक लिहितो, असे सांगत त्यांनी भाषणात प्रसार माध्यमांवरही मिश्किल टीका केली.