मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाला असून, काँग्रेस अंतर्गत चव्हाण व आमदार उंडाळकर या दोन्ही गटांमध्ये मताधिक्य देण्यासाठी जणू चुरस लागल्याचे दिसून येत आहे. परिणामी एकमेकांच्या जणू मुळावर उठणा-या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ असाच प्रकार सुरू आहे. काँग्रेसमधील दोन्ही गटांकडून राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजेंना बिनशर्थ आणि ताकदीचे समर्थन मिळताना, आपली ताकद दाखवण्याचा आटापिटा काँग्रेस नेत्यांकडून सुरू असल्याची गंमत सध्या पहावयास मिळत आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी मी उमेदवार असल्याचे समजून उदयनराजेंना मतदान करण्याचे तसेच, प्रेमलाकाकी चव्हाणांप्रमाणेच उदयनराजेंना देशात विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांंना केले आहे. तर, उंडाळकर गटाच्या या मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या गटाचाही मेळावा पार पडला. त्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी कार्यकर्त्यांने स्वत: उमेदवार असल्याचे समजून उदयनराजेंच्या प्रचाराचा धडाका लावावा असे आवाहन केले आहे.
उंडाळकर आणि चव्हाण गटाचे अपेक्षेप्रमाणे स्वतंत्र मेळावे पार पडले. विशेष म्हणजे त्यात दोन्हीकडचे नेते आणि कार्यकर्ते पुर्णत: वेगळे होते. त्यामुळे काँग्रेसमधील जणू परंपरागत ठरू पहात असलेली ही गटबाजी चांगलीच ताणली जाताना, उदयनराजेंच्या आपसूक पथ्यावर पडली आहे. यावर ही गटबाजी अशीच उदंड होऊ दे असा तिढा राष्ट्रवादीच्या गोटात चर्चेला जात आहे. सातारा लोकसभेची निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालिम असल्याने कराड दक्षिणच्या गडावर वर्चस्वासाठी काँग्रेसमधील दुही चव्हाटय़ावर येणे क्रमप्राप्त होते. आणि त्याचीच प्रचिती दोन्ही गटांचे स्वतंत्र मेळावे, बैठका, प्रचाराचे नियोजन आणि त्या अनुषंगाने स्वतंत्र मांडली जाणारी भूमिका यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कराडातील काँग्रेसचा हा सावळा गोंधळ सुज्ञ मतदारांच्या टीकेचा विषय बनून राहतो आहे. खरेतर काँग्रेसजणांचा व्यापक मेळावा होऊन त्यात मित्रपक्षाला सहकार्याची भूमिका घेताना, अवघ्या महाराष्ट्रासमोर  एकोप्याची अन् शक्तिप्रदर्शनाची संधी काँग्रेसनेत्यांना होती. मात्र, गटबाजीतच धन्यता मानणा-या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचीही तशी मानसिकता होऊन ती अधिक घट्ट होत असल्याचे खेदजनक चित्र दिसून येत आहे.