नरेंद्र मोदी यांच्या सुनामीत नांदेडचा गड सुरक्षित राखण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. मात्र, राज्यातील लोकसभेच्या अपयशाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, या दृष्टीने खासदार अशोक चव्हाण यांच्यासह नांदेडचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासमोर काही उपाय, काही सूचना मांडतानाच मागण्याही सादर केल्या.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवावर प्रदेश काँग्रेसने मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचे सत्र सुरू केले. मुख्यमंत्री, तसेच प्रदेशाध्यक्षांना पहिल्या दिवशी पराभूत उमेदवार व समर्थकांचे तोंड बघावे लागले. पण गुरुवारच्या सत्रात टिळक भवनाला अशोक चव्हाण व राजीव सातव या विजयी खासदारांनी भेट दिली. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण, तर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सातव यांचा सत्कार केला. राज्यभरातील पडझडीत अशोक चव्हाण यांनी आपल्या जिल्ह्य़ात मोदी लाट एकहाती थोपविली. कालच्या बैठकीत त्यांनी प्रारंभीच प्रचार साहित्य, यंत्रणा व जाहिरातबाजीत पक्ष कमी पडला, याकडे लक्ष वेधले. आव्हानांना तोंड देतानाच कार्यकर्त्यांना भक्कम पाठबळ देण्याचे धोरण पक्षाने घ्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चव्हाण या बैठकीस पूर्णवेळ थांबू शकले नाहीत. त्यानंतर अन्य लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेत्यांपुढे विविध बाबी मांडल्या. आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी मुस्लिम समाजात पक्षाबद्दल विश्वासाचे वातावरण तयार करायचे असेल, तर विधान परिषदेवर या समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली. वक्फ बोर्ड, हज कमिटीवरील नेमणुका त्वरित करा, अशी सूचनाही केली. जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी शेतकरी व शेतीचे प्रश्न मांडून ग्रामीण जनतेला आघाडीकडे आकर्षित करण्यासाठी तत्काळ निर्णय घेण्याची विनंती केली. विलासरावांच्या काळात १६ तास वीज उपलब्ध होत होती. आता ग्रामीण भागात ८ ते १० तास वीज व बिल मात्र अखंड पुरवठय़ाचे, या विसंगतीकडे लक्ष वेधत ठोस निर्णय घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट केले.
अशोक चव्हाण यांना आघाडी देण्यात अपयशी ठरलेल्या आमदार हणमंतराव बेटमोगरेकर यांनी लेन्डी प्रकल्प, तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित विषयाचा मुद्दा मांडला. जि. प. अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर यांनीही काही सूचना मांडल्या. बेटमोगरेकर यांना बैठकीची सूचना उशिराने मिळाली, तर पक्षाचे सहयोगी आमदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना तर बैठकीचे आमंत्रण नव्हते. माजी खासदार भास्करराव खतगावकर टिळकभवनात फिरकलेच नाहीत.
नांदेडचे महापौर अब्दुल सत्तार यांनी आपल्या गडातून मताधिक्यात मोठी भर घातल्याबद्दल पोकर्णा यांनी त्यांचे कौतुक केले. त्याच अनुषंगाने मुस्लिम बांधवातून एखाद्या कार्यकर्त्यांला विधान परिषदेवर घ्या, अशी सूचना मांडली. राष्ट्रवादीने फौजिया खान यांना दोनदा संधी दिली. मग काँग्रेसने नांदेडच्या महापौरांचा विचार का करू नये, असा मुद्दा समोर आला. दिलीप कुंदकुर्ते यांनी एलबीटीच्या मुद्दय़ावर व्यापारी वर्गात असलेल्या नाराजीकडे लक्ष वेधले. पालकमंत्री डी. पी. सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार माधवराव जवळगावकर, अमर राजूरकर, उपमहापौर आनंद चव्हाण, संजय लहानकर उपस्थित होते.