04 June 2020

News Flash

शेकापच्या उमेदवारीने राजकीय पक्षांना धसका

शिवसेनेशी असलेली युती तोडत शेकापने रायगड लोकसभा मतदारसंघात रमेश कदम यांना उमेदवारी दिल्याने, सेनेच्या अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. या

| March 18, 2014 03:43 am

शिवसेनेशी असलेली युती तोडत शेकापने रायगड लोकसभा मतदारसंघात रमेश कदम यांना उमेदवारी दिल्याने, सेनेच्या अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. या उमेदवारीचा उत्तर रायगडात गीतेंना तर दक्षिण रायगडात तटकरे यांना थेट फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

रायगड लोकसभा मतदारसंघात अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील सध्याचे पक्षीय बलाबल लक्षात घेतले तर शेकाप दोन, शिवसेना दोन आणि राष्ट्रवादीकडे जागा सध्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शेकापने शिवसेनेशी युती करत आपला उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे सेनेच्या अनंत गीते यांचा तब्बल पावणे दोन लाख मतांनी विजय झाला होता. काँग्रेस उमेदवार बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या विरोधात मतदारांमध्ये असणारी नाराजी आणि शेकापची भक्कम साथ या गीतेंसाठी उजव्या बाजू ठरल्या होत्या.
मात्र शिवसेनेसाठी आता परिस्थिती बदलणार आहे. कारण शेकापने आपला उमेदवार उभा केल्याने दोन्ही राजकीय पक्षांच्या एकत्रित मतांचे थेट विभाजन होणार आहे. याचा प्रमुख फटका गीतेंना उत्तर रायगडात बसण्याची शक्यता आहे. कारण अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघांवर सध्या शेकापचे प्राबल्य आहे. दोन्ही मतदारसंघांत जवळपास दीड लाख मते शेकापकडे आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना या दोन मतदारसंघांत मिळालेली मतांची आघाडी या वेळेस मिळू शकणार नाही. मात्र विभागलेली मते ही राष्ट्रवादीच्या तटकरेंनाही मिळणार नाहीत हीच त्यांच्यासाठी दिलासा देणारी गोष्ट असणार आहे.
दुसरीकडे शेकाप-सेना मतविभाजनाचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला होईल, असा आशावाद राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो आहे. मात्र रमेश कदम यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीला दक्षिण रायगड लोकसभा मतदारसंघात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेल्या रमेश कदम यांनी चिपळूण, गुहागर, परिसरात पक्षबांधणीसाठी काम केले आहे. त्यामुळे गुहागर मतदारसंघात रमेश कदम यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीच्या मतांचेही विभाजन होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रायगड जिल्ह्य़ातील काँग्रेसमध्ये तटकरे यांच्या उमेदवारीबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे तटकरे यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत रमेश कदम यांना उमेदवारी देण्यामागे शेकापचे काही आडाखे आहेत. कदम यांच्या उमेदवारीमुळे शेकापला. रायगडच्या सीमा ओलांडून रत्नागिरीत प्रवेश करता येणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षसंघटन मजबूत करता येणार आहे. दुसरीकडे कदम यांना गुहागर आणि दापोली मतदारसंघांत जी मते मिळतील त्यांचा थेट फटका राष्ट्रवादी आणि सेनेला बसणार आहे. मात्र शेकापसाठी हा बोनस असणार आहे हे मात्र नक्कीच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2014 3:43 am

Web Title: affright to political parties due to shetkari kamgar paksha decision
Next Stories
1 वाघापाठोपाठ बिबटय़ाचे कातडे हस्तगत
2 ४२ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव
3 रमेश कदमांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीची फळी विस्कळीत
Just Now!
X