हिवाळा सुरू झाल्यानंतरही थंडी जाणवली नाही. परंतु आता उशिरा दखल घ्यावयास भाग पाडणाऱ्या थंडीने गुरुवारी कहर केला. २००३ नंतर प्रथमच जिल्ह्याचे तापमान ३.६ अंश इतके खाली घसरले. कडाक्याच्या थंडीला वाऱ्याची साथ लाभल्याने थंडीमध्ये आणखी भर पडली. वाढत्या थंडीचा जनजीवनावरही मोठा परिणाम जाणवत आहे. थंडीमुळे दिवसभरातही लोक ऊबदार कपडय़ांमध्येच वावरताना दिसत आहेत.
यंदा थंडी महिनाभर उशिराने जाणवू लागली. डिसेंबरच्या सुरुवातीपासून कडाक्याचे ऊन, तसेच वातावरणात उकाडा जाणवत होता. मागील ८ दिवसांपासून वातावरण बदलले. ढगाळ हवामान व पहाटेच्या वेळी धुक्यामुळे थंडी गायब झाली होती. काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही पडला. त्यामुळे थंडी लांबत गेली. मंगळवारपासून मात्र थंडीचा जोर वाढला. मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ८.३ अंश नोंदवले गेले. बुधवारी रात्रीपासून थंडीचा कडाका वाढला. गुरुवारी सकाळी आठपर्यंत परभणीचे तापमान ३.६ अंशांवर घसरले. २००३ नंतर प्रथमच इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली. १७ जानेवारी २००३ या दिवशी २.८ तापमानाची नोंद परभणीत झाली होती, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वेधशाळेतील अधिकाऱ्यांनी दिली.
गुरुवारी दिवसभर थंडी जाणवली. वाढत्या थंडीमुळे सकाळी मॉìनग वॉकला जाणाऱ्यांनी वेळ बदलली आहे. नागरिक भल्या पहाटे घराबाहेर पडण्याऐवजी चांगले उजाडल्यानंतर बाहेर पडत आहेत. शाळेत जाणारी चिमुकलेही स्वेटर व मफलर गुंडाळून शाळेत जात आहेत. थंडीपासून बचाव करणारे स्वेटर, मफलरची दुकाने शहरात थाटली गेली आहेत.
गेल्या २ दिवसांपासून थंडीचा कडाका आहे. दुपारचे काही तास वगळता दिवसभर थंडीचे अस्तित्व असते. सकाळी ऊन पडल्यानंतरही थंडी जाणवत असून केवळ ३-४ तास वगळता पुन्हा सायंकाळपासून थंडीचा जोर वाढत आहे. एकूणच थंडीने सध्या अनेकांना हैराण केले असून सकाळी फिरायला जाणाऱ्यांवरही थंडीने परिणाम केला आहे.