करोना संकटकाळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून वारंवार मारहाण होत असतांना त्याकडे कानाडोळा होत असल्याची तक्रार स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतक हजाराहून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शनिवारी अचानक कामबंद आंदोलन सुरू केले होते. पण, यापुढे पोलिसांकडून मारहाण होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही महापालिका प्रशासनातर्फे दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

महापालिकेत कायमस्वरूपी ६०० आणि मानधनावरील सुमारे ४२५ स्वच्छता कर्मचारी तैनात आहेत. याशिवाय कचरा संकलन करणाऱ्या खाजगी ठेकेदाराचेही कर्मचारी स्वच्छतेचे काम करीत असतात. शहर स्वच्छता ही बाब अत्यावश्यक सेवेत असल्याने करोना संकटामुळे शहरात लागू झालेल्या संचारबंदीतही या कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन कामाची जबाबदारी पेलणे बंधनकारक आहे. अशा स्थितीत अत्यंत जोखमीचे काम पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांना बंदोबस्तावरील पोलिसांकडून अनेकदा मारहाण होत असून अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र दाखवूनही पोलीस जुमानत नसल्याची या कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. एकीकडे कामावर येण्यासंदर्भात वरिष्ठांचा आदेश आणि दुसरीकडे पोलिसांकडून बसणारे दंडुके यामुळे हैराण झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत वरिष्ठांच्या कानी घातली.

मात्र त्यात फरक न पडता कर्मचाऱ्यांवर मार पडतच होता. आठवडाभरात दहापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या जबर मारहाणीला सामोरे जावे लागले असून शुक्रवारी एकाच दिवसात पाच कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण झाली. त्यात एका कर्मचार्‍याचा तर चक्क हात फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं होतं.

या मारहाणीच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी अघोषित काम बंद आंदोलन सुरू केले. त्याची गंभीर दखल घेऊन पालिका प्रशासनाने कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी दुपारी बैठक घेतली. या प्रश्नी अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष घालणार असून यापुढे कर्मचाऱ्यांना मारहाण होणार नाही अशी ग्वाही आयुक्त किशोर बोर्डे व उपायुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी दिली. तसेच सध्याच्या आणीबाणीच्या काळात आंदोलन करणे योग्य होणार नाही याकडेही उभयतांनी लक्ष वेधले. त्यास संघटना पदाधिकार्‍यांनी प्रतिसाद देत आंदोलन मागे घेण्याचे मान्य केले. त्यानुसार दुपारनंतर हे कर्मचारी कामावर हजर झाले.