पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाच्या पदरी निराशा आल्यानंतर इतर पक्षांमधून भाजपामध्ये सामील झालेल्या नेत्यांची घरवापसी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. माझ्या संपर्कात अनेक जण आहेत. पण, त्यांची नावे आताच सांगणार नाही असं छगन भुजबळ म्हणालेत.

एनडीएमधून बाहेर पडलेले उपेंद्र कुशवाह यांच्यासह भुजबळांनी आज (दि.१२) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस राष्ट्रवादीतून अनेकजण भाजपामध्ये गेले आता पुन्हा ते घरवापसी करतील का या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपाच्या ‘अच्छे दिन’चा भ्रमनिरास झालाय. पक्ष सोडून गेलेल्यांनी परत यायला हरकत नाही. माझ्या संपर्कात अनेक जण आहेत. पण, त्यांची नावे आताच सांगणार नाही. तसेच देशातील पाच राज्याच्या निवडणुकीचा निकाल लक्षात घेता भाजपाच्या शेवटाचा प्रवास सुरू झाला असून आम्हाला ‘अच्छे दिन’ नको तर ‘हमारे दिन’ हवे असा टोलाही भुजबळांनी लगावला. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात सामील झालेले नेते पुन्हा स्वगृही परतण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं.