ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला एक महिन्याने मुहूर्त लाभला. मात्र या विस्तारानंतर शिवसेनेत तीव्र नाराजी असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या नाराज आमदारांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे. नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचं आव्हान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आहे. सगळे नाराज आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या आमदारांनी अजून उद्धव ठाकरेंची वेळ घेतलेली नाही.

मंत्रिमंडळ विस्तारात शरद पवारांनी हस्तक्षेप केल्याने डावललं गेलं अशी भावना अनेक शिवसेना आमदारांमध्ये असल्याची कुजबूज आहे. याशिवाय मंत्रिमंडळातील सगळी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेल्याने आमदारांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी संजय राऊत गैरहजर होते. त्यामुळे संजय राऊतही नाराज आहेत अशी चर्चा होती. सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याची चर्चा होती. मात्र संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत असं काहीही घडलं नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र भास्कर जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी या आमदारांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

निष्ठा कमी पडली असेल तर आगामी काळात दाखवून देऊ असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. तर मी राष्ट्रवादी सोडून जेव्हा शिवसेनेत आलो तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी काही गोष्टींबाबत चर्चा झाली होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. मला वाटत होतं की मी मंत्रिमंडळात असेन, मात्र शेवटच्या क्षणी काय झालं माहित नाही असंही भास्कर जाधव यांनी सांगितलं.