करोना संपल्यानंतर मी राज्यभराचा दौरा करणार असल्याची घोषणा आज पंकजा मुंडे यांनी केली. विधान परिषद निवडणुकीनंतर मी पक्ष सोडणार, अशा बातम्या पेरल्या जात आहेत. या बातम्यांवर विश्‍वास ठेवू नका, मी पक्ष सोडणार हे तुम्ही ठरवणारे कोण? असाही प्रश्न त्यांनी विचारला. तसंच माझं राजकारणातील, पक्षातील स्थान काय? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. पण माझ्या मनात एकही प्रश्‍न नाही. मी नव्या आत्मविश्‍वासाने जनसेवेसाठी लढणार असून करोनाचे संकट संपल्यानंतर राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली.

एवढंच नाही तर ‘गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत कार्यकर्ते व समन्वयकांची शक्ती उभा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले बीड जिल्ह्यातील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त बुधवारी ३ जून रोजी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या समर्थकांशी संवाद साधला. विधान परिषद निवडणुकीत अपेक्षा असतानाही पक्षाने डावलल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा काय बोलतात? याकडे लक्ष होते. करोना संसर्गाची खबरदारी म्हणून त्यांनी गोपीनाथगडावरील दौरा रद्द केला. समर्थकांशी संवाद साधताना पंकजा यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पाच वर्षापूर्वी मला सत्तेची संधी मिळाली तेव्हा लोकांना आनंद झाला. मंत्रालयातील माझा मजला गर्दीने दुमदुमुन जात होता. नव्वद टक्के लोकांचे प्रश्‍न सोडवले मात्र दहा टक्के लोकांचे प्रश्‍न सोडवू शकली नाही त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी मी खचून गेलेली नाही. दिवंगत मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले होते. त्यामुळे मी ही नव्या आत्मविश्‍वासाने पुन्हा लोकांच्या सेवेत जाणार आहे.

करोनामुळे मी घरात आहे. मला कोणत्याच पदाची लालसा नाही असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावत पातळीपर्यंत कार्यकर्ते आणि समन्वयकांची फळी उभी करुन जनसेवेचा यज्ञ करणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.