जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांसोबत कर्मचाऱ्यांची अरेरावी गेल्या काही दिवसांपासून नेहमीच पाहावयास मिळत आहे. मंगळवारी पहाटे प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रुग्णालयात घडली. या वेळी संबंधित डॉक्टर उपस्थित नसल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडल्याचे सांगत मृत महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात सकाळी सहापासून ठिय्या आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली. ही कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कळंब तालुक्यातील सापनाई येथील बालाजी पोपट डोंगरे यांची बहीण वंदना अशोक मडके (मोहा) यांना सोमवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. पहाटे दोनच्या सुमारास वंदना यांची प्रसूती होऊन त्यांनी बाळाला जन्म दिला. मात्र, त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच वंदना यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला.
पहाटे वंदना यांची प्रसूती झाली, त्यावेळी रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. डय़ुटीवर उपस्थित परिचारिकांनी वेळेवर उपचार न केल्याने रक्तस्त्राव होऊन पहाटे पाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. या वेळी कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरली. संबंधित डॉक्टर व डय़ुटीवरील कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या दिला. जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव घालून याविषयी जाब विचारला. या वेळी शल्यचिकित्सक डॉ. धाकतोडे यांची भंबेरी उडाली.