कोकण, मध्य महाराष्ट्रानंतर मराठवाडय़ातही प्रवेश

पुणे : केरळमधून द्रुतगतीने दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल झालेल्या मोसमी पावसाची राज्यातील घोडदौड सुरूच असून, दोन दिवसांत त्याने ३० टक्के भाग व्यापला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांनंतर आता त्याने मराठवाडय़ातही प्रवेश केला आहे.

अलिबागपासून पुणे आणि उस्मानाबाद अशी पावसाची पश्चिम-दक्षिण प्रगती झाली आहे. पुढील काही दिवसांत मोसमी पाऊस राज्याच्या इतर भागांतही प्रवेश करतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी रविवारी (६ जून) पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस झाला.

केरळमध्ये नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस उशिराने म्हणजे ३ जूनला मोसमी पावसाने प्रवेश केला. त्यामुळे पाऊस ६ जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज होता. मात्र पोषक स्थितीमुळे अवघ्या दोन दिवसांच्या विक्रमी वेळेत पाऊस ५ जूनला केरळमधून महाराष्ट्रात दाखल झाला आणि त्याच दिवशी त्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर हे सहा जिल्हे व्यापले. दुसऱ्या दिवशी ६ जूनलाही पावसाने वेगाने प्रगती केली असून, रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग आणि पुणे जिल्ह्य़ातही प्रवेश करून तो पुणे शहरापर्यंत दाखल झाला. पावसाने रविवारी मराठवाडय़ापर्यंत मजल मारली. पाऊस उस्मानाबादला पोहोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

बंगालच्या उपसागराच्या दिशेनेही पूर्व-उत्तर भागात मोसमी पावसाने प्रगती केली आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आदी राज्यांनंतर पाऊस थेट हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचला आहे. सद्य:स्थितीत मोसमी वारे संपूर्ण केरळ, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये सक्रिय झाले आहेत. आंध्र प्रदेशचाही बहुतांश भाग पावसाने व्यापला असून, महाराष्ट्रात ३० टक्के भागांत पाऊस सुरू झाला आहे.

पाऊस नोंद.. राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पाऊस सुरू झाला आहे. पुणे परिसरात शनिवारी रात्री आणि पहाटेही पाऊस होता. मुंबई परिसरातही काही ठिकाणी पाऊस झाला. रविवारी नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, महाबळेश्वर, परभणी, अकोला, अमरावती भागांत पावसाची नोंद झाली.

अंदाज काय?

कोकण किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. परिणामी दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.