पाण्याच्या लाटांवर जेथे आजपर्यंत मोटरबोट किंवा होडय़ा तरंगताना पाहिल्या तेथे शनिवारी सकाळी अ‍ॅम्फिबियन विमान थेट अलगद विसावले. हा क्षण डोळ्यात साठवण्याकरिता हजारोंचा जनसमुदाय रामटेकजवळील खिंडसी जलाशयाच्या काठावर जमला होता.
 मुंबईत ऑगस्टमध्ये सुरूझालेल्या मेहेर (मेरिटाइम एनर्जी हेली एअर सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीच्या सी प्लेनच्या सेवेनंतर अवघ्या तीन महिन्यात उपराजधानीतही त्यासाठीची चाचणी शनिवारी पार पडली. वैमानिक कॅ. प्रियंका मनुजा हिने या विमानाचे सारथ्य केले. कॅ.राहुल आणि गौरव सहवैमानिक होते. मॅक्स परेरा व गोपाल बालपांडे यांनी बोटीचे सारथ्य केले. नागपूर विमानतळावरून सकाळी सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान रामटेक तालुक्यातील खिंडसी जलाशयाकडे झेपावलेले हे विमान अवघ्या १५ मिनिटात पाण्यावर उतरले. तब्बल अर्धा तास पाण्यावर घिरटय़ा घातल्यानंतर १५ मिनिटात पेंचमधील नवेगाव खरी जलाशयावरही ते उतरले. टेकडय़ांनी वेढलेल्या या जलाशयाच्या काठावर जमलेल्या नागरिकांनी यावेळी एकच जल्लोष केला.
विदर्भातील पर्यटन जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी हा प्रयोग ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भात असून ते जलाशयाने वेढलेले आहेत. सोबतच गडमंदिर, किल्ल्यांचे वैभव या ठिकाणी आहे. मात्र, पर्यटनाच्या नेमक्या प्रसाराअभावी जागतिक स्तरावर त्याची दखलच घेतली गेलेली नव्हती. रामटेकचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नातून राज्यात ही सेवा सर्वप्रथम मुंबई येथे सुरू झाली. त्यामुळे मेहेर कंपनीने जयस्वाल यांना दिलेला शब्द पाळला आणि खिंडसी जलाशयावर या सेवेची यशस्वी चाचणी पार पडली. या जलाशयातील या सेवेचे प्रकल्प समन्वयक म्हणून सीएसी ऑलराउंडरच्या अमोल खंते यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या निरीक्षकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर येत्या दीड-दोन महिन्यात ही सेवा सुरू होणार आहे.
साडेतीन वर्षे अंदमानमध्ये सेवा दिल्यावर महाराष्ट्रात ही सेवा देताना आनंद होत आहे. येथील उत्साह बघून हिंमत मिळाली आणि लवकरच एक-दीड महिन्यात सी प्लेन सेवा कायमस्वरूपी सुरू करणार असून त्यासाठीचे पॅकेजही सर्व आढावा घेऊन ठरवणार आहोत.
-सिद्धार्थ वमा, मेहेर कंपनीचे अधिकारी
          
केंद्र सरकारशी बोलणी करून विदर्भातील पर्यटनस्थळांचा या पद्धतीने विकास करण्याकरिता प्रयत्न करू.
-कृपाल तुमाने, खासदार