धुळे : संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेप भोगत असलेला युसूफ मेमन याच्या मृतदेहाचे शनिवारी सकाळी येथील शासकीय रूग्णालयात विच्छेदन करण्यात आल्यावर मृतदेह पोलीस बंदोबस्तात मुंबई येथे नेण्यात आला. मुंबईतच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती धुळे पोलिसांनी दिली.

मुंबईत १९९२-९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी टायगर मेमन याचा युसूफ हा भाऊ होय. २०१८ मध्ये सुरक्षेच्या कारणावरून युसूफला नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी नाशिकरोड कारागृहातील स्वच्छतागृहात युसूफला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. त्यानंतर धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्याचे ठरल्यांतर शुक्रवारी रात्रीच मृतदेह धुळ्यात आणण्यात आला होता. रात्रीपासून शवविच्छेदन गृहासमोर पोलिसांचा बंदोबस्त होता. शनिवारी सकाळी वरिष्ठा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन झाले. युसूफचा भाऊ  सुलेमान मेमनही धुळ्यात आला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी युसूफवर धुळ्यातच अंत्यसंस्कार करावे, अशी सूचना सुलेमानला केली. परंतु, त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दुपारी बंदोबस्तात मृतदेह मुंबईकडे नेण्यात आला.