राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरु झाल्यानंतर स्वत: धनजंय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली बाजू मांडली आहे.

“माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे तसेच मला ब्लॅकमेल करणारे आहेत” असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान आता माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, अशी मागणी केली आहे.

“धनजंय मुंडे यांनी स्वत: त्यांना दोन पत्नी आहेत, असे मान्य केले आहे. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करतेय, त्यामुळे जो पर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तो पर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

 

काय म्हटले आहे धनंजय मुंडे यांनी

एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधांमधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांचा पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे मी सर्वोतोपरी त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापन करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत.

मात्र २०१९ पासून सदर महिला व तिची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. माझ्या जीवाला गंभीर शारीरिक इजा पोहोचवण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ देखील सहभागी होता. मोबाईलवरून ब्लॅकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे SMSचे पुरावे माझ्याकडे आहेत. दबाव तंत्राचा हा भाग असू शकतो. या सर्व प्रकरणाची संबंधितांकडून योग्य चौकशी केली जाईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.