काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आज संध्याकाळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी चर्चा होतीच. नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“पक्षाने मला आदेश दिला. त्याचे मी पालन केले. पक्षाने सांगितलं त्याप्रमाणे मी राजीनामा दिला. मी मंत्रिपद किंवा कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही असे त्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून आपल्याला पक्षाकडून काहीही सांगितलेलं नाही. पक्ष आदेश देईल. त्याचं मी पालन करेन” असे नाना पटोले म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना मी त्या खुर्चीला जनतेची खुर्ची बनवली याचा अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्ही राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार ? या प्रश्नावर ते म्हणाले की, “हा निर्णय तीन पक्षाचे नेते घेतील. तीन पक्षांचे प्रमुख या संदर्भात बैठक करुन, निर्णय घेतील. विधानसभा अध्यक्ष निवडण्याची  प्रक्रिया अधिवेशन काळातच होते” असे त्यांनी सांगितले.