मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. तर, न्यायालयाच्या आदेशानंतर गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे. अशी माहिती देशमूख यांनी ट्विटरद्वारे दिली.

देशमूख यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने आनंद व्यक्त केला. भाजपाने एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून या प्रकरणी दिलेल्या लढ्याला यश आलं, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपावर टीका केली आहे. मंत्रीमंडळात स्वर्गीय माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यानंतर एक आदर्श गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांच्याकडे पाहिले गेले, पण भाजपाच्या सुडाच्या राजकारणामुळे आज अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला, अशी टीका मटकरी यांनी केली आहे. तसेच, अनिल देशमुख यांच्या इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असंही मिटकरी यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदी ‘या’ नेत्याची लागणार वर्णी

देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरद्वारे मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. “गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी इतकी वर्ष राजकीय कारकीर्द सांभाळली ज्यात त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हते. मंत्रिमंडळात एक आदर्श गृहमंत्री म्हणून आबांनंतर त्यांच्याकडे पाहिले गेले. भाजपाच्या सुडाच्या राजकारणामुळे आज त्यांना राजीनामा द्यावा लागला… वेदनादायी.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं.

आणखी वाचा- गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आणखी वाचा- अनिल देशमुखांचे राजीनामा पत्र : “…म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतोय”

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे व अन्य एका अधिकाऱ्याला महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अ‌ॅड. जयश्री पाटील यांनीही अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर या पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असं म्हणत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.