05 March 2021

News Flash

“नेहरु सेंटरमधील ‘त्या’ बैठकीनंतर अजित पवारांनी घेतला होता तडकाफडकी निर्णय”

वर्षभरापूर्वीच्या सत्तानाट्याचा संजय राउत यांनी केला गौप्यस्फोट

संग्रहित छायाचित्र (PTI)

गेल्यावर्षी राज्यातील सत्तानाट्यामध्ये अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रम उरकला होता. ही घटना का घडली होती याबाबत खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या नेहरु सेंटरमधील त्या बैठकीतील चर्चेनंतर अजित पवार यांनी तडकाफडकी निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण राउत यांनी सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून केले आहे.

खर्गे-पवार यांच्यात शाब्दिक चकमक

राउत म्हणाले, “नेहरु सेंटरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी सत्तेसाठीच्या वाटाघाटी सुरु असताना मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली होती. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी खर्गे ठाम होते. यावरुन खर्गे आणि शरद पवार यांच्या शाब्दिक चकमक झाली. पवार त्यावेळी खूपच संतापले होते, त्यामुळे ते बैठकीतून उठले आणि निघून जाऊ लागले. याच बैठकीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील हे शरद पवार यांनी सुचवले होते. पण खर्गे आणि पवार यांच्या चकमकीने बैठकीचा नूर पालटला होता. यावेळी अजित पवार बराच वेळ खाली मान घालून मोबाईलवर चॅटिंग करत होते. त्यानंतर त्यांचा फोन स्वीच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे थेट राजभवनावर शपथविधी सोहळ्यातच दर्शन झाले.”

पवार-शाह यांच्या दिल्लीतील बैठकीमुळे नाट्य घडल्याचं सर्वस्वी चूक

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार आणि अमित शाह यांच्यात दिल्लीत बैठक झाली त्यामुळे पहाटेच्या शपथविधीचे नाट्य तयार झाले ही चर्चा सर्वस्वी चूक आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. “दिल्लीत पवार आणि माझ्यामध्ये उत्तम संवाद होत होता. रोजच आम्ही भेट होतो भाजपाशी डील करण्याच्या ते मनस्थितीत नव्हते. पण भाजपाकडून ऑफर्स येत असल्याचे सांगत होते. लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेऊन भाजपासोबत सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे आपण त्यांना सांगणार असल्याचंही त्यांनी मला सांगितलं होतं. याच काळात शेतकरी प्रश्नांसंदर्भात पवारांनी मोदींची भेट घेतली आणि राज्यातील सत्तेबाबतही स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे शरद पवारांनी भाजपाला शब्द दिला होता त्यामुळेच पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटं आहे, असं राऊत यांनी रोखठोकमधून स्पष्ट केलं आहे.

सत्तानाट्यावर मी पुस्तक लिहिल्यास ती चार पुस्तकं खोटी ठरतील – राऊत

“वर्षभरापूर्वी झालेल्या ३६ दिवसांच्या सत्तानाट्यावर आत्तापर्यंत चार पुस्तकं आली. पण मी या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे त्यामुळे मी यावर कधी पुस्तक लिहिणार असं मला एका संपादकांनी मुलाखतीत विचारलं होतं. त्यांना मी सांगितलं मी जर यावर पुस्तक लिहिलं तर इतर चार पुस्तकं खोटी ठरतील. त्यामुळे शरद पवार आणि माझी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गुप्त बैठक झाल्याचं खोट आहे, मी त्यांना नेहमीच उघडपणे भेटतो. त्यामुळे सत्तानाट्याची ही पटकथा अद्याप पडद्यामागेच आहे व राहिल,” असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 8:44 am

Web Title: after that meeting at the nehru center ajit pawar had taken a sudden decision to go with bjp for form a gov says sanjay raut aau 85
Next Stories
1 लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींकडून ताब्यात – पृथ्वीराज चव्हाण
2 ‘सक्षम आरोग्य यंत्रणेसाठी ४४०० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव’
3 पदवीधर मतदारसंघात साखर कारखान्याचे कामगार, शिक्षक प्रचारात
Just Now!
X