News Flash

कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे शहरात पर्याय नसल्याचे उघड

काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील निर्धार परिवर्तन यात्रेच्या पूर्वतयारीसाठी नगरमध्ये आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

पक्ष संघटनेचे नेतृत्व पुन्हा जगतापांकडे, अजित पवार यांचे संकेत

महापौर निवडणुकीत भाजपला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ. संग्राम जगताप यांचे समर्थक असलेल्या १८ नगरसेवक व शहर जिल्हाध्यक्षांची पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली असली तरी प्रत्यक्षात ही कारवाई म्हणजे एक प्रकारचा देखावाच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पक्षाच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त नगरमध्ये आलेले पक्षाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींनी आ. जगताप समर्थकांना भेट देत शहरातील पक्ष संघटना पुन्हा आ. जगताप यांच्याच नेतृत्वाखाली उभारण्याच्या सुचना केल्या आहेत. याशिवाय अजित पवार यांनी नगर तालुक्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बंद खोलीत भेट घेतल्याने, पवार यांचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधकांना बळ देण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे मानले जात आहे.

निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्ताच्या दौऱ्याने झालेल्या घडामोडीतून राष्ट्रवादीमध्ये पक्षाचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे समर्थक असे दोन स्वतंत्र गट अस्तित्वात असल्याचेही समोर आले आहे. महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला मतदान केल्याने राज्यभर खळबळ उडाली. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही घटना घडल्याने त्याची दखल घेतली गेली. आ. जगताप व त्यांचे समर्थक वरिष्ठ नेत्यांना पूर्वकल्पना दिल्याचा दावाही त्यावेळी करत होते, मात्र स्वत: पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी नगरमध्ये येत त्याचे खंडन केले व कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले. १८ नगरसेवक व शहर जिल्हाध्यक्षांवर कारवाई झाली खरी मात्र या निर्णयाची जाहीरपणे जबाबदारी स्वीकारणाऱ्या जगताप यांना मात्र त्यातून वगळले गेले. कारवाई झाली असली तरी १८ नगरसेवकांनी आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत व जगताप यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहोत, असे जाहीर केले होते, याकडे लक्ष वेधले जात आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेवर अद्यापि जगताप समर्थकांचेच वर्चस्व आहे. कारवाई होणार हे स्पष्ट होताच माजी आमदार दादा कळमकर यांनी या घडामोडींशी आपला काही संबंध नसल्याचे व आपल्याला पक्षातीलच काहीजण बदनाम करत असल्याचा खुलासा केला होता.

काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील निर्धार परिवर्तन यात्रेच्या पूर्वतयारीसाठी नगरमध्ये आले होते. त्यावेळी नगरसेवकांनी आ. अरुण जगताप यांच्या मध्यस्थीने त्यांची राष्ट्रवादी भवनमध्ये बंद खोलीत त्यांची भेट घेतली व आपली बाजू त्यांच्यापुढे मांडली. मात्र त्यानंतरही प्रदेशाध्यक्षांनी कारवाई मागे घेतली जाणार नसल्याचेच स्पष्ट केले होते. त्याचबरोबर नगरसेवकांची भेट पूर्वनियोजित नसल्याचेही स्पष्ट केले होते. दुसरीकडे निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त दोन दिवस पक्षाचे नेते अजित पवार, आ. जयंत पाटील नगरमध्ये होते. काल, शुक्रवारी त्यांची जगताप समर्थक पदाधिकाऱ्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी भवनऐवजी पवार यांनी त्यांना शहराबाहेर, जेऊर (ता. नगर) येथील सभेनंतर भेटीची वेळ दिली. ही भेट घडली तीही सध्या शिवसेनेत असलेले व पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्या इमामपूर येथील निवासस्थानी.

जगताप समर्थक पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, बाबासाहेब गाडळकर, सुरेश बनसोडे, साहेबान जहागीरदार, अमित खामकर, जॉय लोखंडे, गजानन भांडवलकर आदींच्या शिष्टमंडळाने पवार यांची मोकाटे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी आ. अरुण जगताप व आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात पक्ष संघटनेची घडी बसवण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागा, कोण, काय बोलत आहे, याकडे लक्ष देऊ नका, अशी सूचना पवार यांनी केल्याचा दावा भेट घेणारे पदाधिकारी करत आहेत. त्यामुळेच पक्ष संघटनेची जबाबदारी जगताप यांच्याकडेच कायम ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दखल घेऊन कारवाई झाल्यानंतरही राष्ट्रवादीला शहरात जगताप यांच्याशिवाय पर्याय नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

आ. कर्डिले विरोधी महाआघाडीला बळ

निर्धार परिवर्तन यात्रेदरम्यान काल सायंकाळी जेऊर (ता. नगर) येथील सभेनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी पदाधिकाऱ्यांची भोजन व्यवस्था सध्या शिवसेनेत असलेले गोविंद मोकाटे यांच्या निवासस्थानी करण्यात आली होती. तत्पूर्वी मोकाटे यांनी पवार यांची राष्ट्रवादी भवनमध्ये जाऊन भेटही घेतली. मोकाटे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे व भाजपचे आ. कर्डिले यांचे कट्टर विरोधक आहेत. नगर तालुक्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचा एक गट (कर्डिले विरोधक असलेले) यांची महाआघाडी आहे. या भोजनाच्या वेळी तेथे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व काँग्रेसमधील विखे समर्थक, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ हेही उपस्थित आहे. नगर तालुक्यातील महाआघाडी कर्डिले विरोधी आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे आदींसह कार्ले, हराळ आदींनी सुमारे दीड तास एका खोलीत घालवला. या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ही भेट म्हणजे कर्डिले विरोधकांना बळ देण्याचा पवार यांचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. ही भेट म्हणजे केवळ योगायोग होता, मोकाटे यांच्याकडे आम्ही जेवणासाठी आलो होतो, त्यावेळी आम्हाला तेथे राष्ट्रवादीचे नेते येणार असल्याचे माहिती नव्हते, आम्ही बाहेर पडत असतानाच तेथे राष्ट्रवादीचे नेते आले, त्यामुळे आम्हाला बाहेर पडणे अवघड झाले व तेथेच त्यांच्याशी अवांतर विषयावर चर्चा करत थांबलो, असा दावा कार्ले यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 1:44 am

Web Title: after the action ncp has no option in the city
Next Stories
1 केंद्रीय मंत्र्यांच्या तासगावमधील कार्यक्रमात राजकीय मानापमान!
2 हजारेंना पाठिंब्यासाठी जेलभरो आंदोलनात १२५ जणांना अटक
3 मतांसाठी कालिया, रयतूबंधू, भावांतर, कृषकबंधू ..
Just Now!
X