18 January 2019

News Flash

साखरेपाठोपाठ गुळाचे दरही घसरले

महाराष्ट्रात २०१७-१८ च्या गळीत हंगामामध्ये विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

गुळाचे दरही गतवर्षांच्या तुलनेत क्विंटलला हजार ते अकराशे रुपयांनी घसरले आहेत.

पाकिस्तानच्या साखर आयातीच्या चच्रेचा परिणाम

सांगली : पाकिस्तानातून साखर आयात केल्याच्या चच्रेने बाजारात साखरेचे दर अडीच हजारावर आले असताना याचा परिणाम सांगलीच्या गूळ बाजारावर पण झाला असून गुळाचे दरही गतवर्षांच्या तुलनेत क्विंटलला हजार ते अकराशे रुपयांनी घसरले आहेत. या गूळदरात आणखी दोनशे रुपयांची घसरण अपेक्षित असल्याचे सांगली चेंबर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी सांगितले.

सांगलीच्या बाजारात प्रामुख्याने कर्नाटकच्या सीमाभागातून वर्षभर गूळ विक्रीसाठी येतो. गेल्या वर्षी गुळाला ३ हजार ८०० ते ४ हजार १०० पर्यंत दर होता. मात्र, यंदा कारखाने सुरू झाल्यानंतर साखरेच्या दरात घसरण सुरू होताच गुळाच्या दरावरही याचा परिणाम झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून गुळाच्या दरात घसरण सुरू असून बुधवारी सांगलीच्या बाजारात गुळाला किमान २ हजार ७०० ते ३ हजार १०० रुपये दर मिळाला.

यातच पाकिस्तानातून साखर आयात केली जात असल्याच्या वात्रेने साखर बाजारात दराची घसरण सुरू झाली असून मंगळवारी सांगलीच्या बाजारात साखरेचे दर २ हजार ४०० ते २ हजार ५५० रुपयापर्यंत खाली घसरले. यामुळे पुन्हा गूळ दरात क्विंटलला दोनशे रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता असून याचा परिणाम गूळ उत्पादनावर होणार आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०१७-१८ वर्षांचा गळीत हंगाम चालू झाला, तेव्हा प्रतिक्वटल साखरेचा दर ३८०० ते ३६०० रुपये होता. देशात साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे दराची घसरण चालू होती. कारखान्यांचे गळीत हंगाम संपताच प्रतिक्विंटल साखरेचे दर २८०० ते ३२०० रुपयांपर्यंत होते. मागील आठवडय़ातील दर २ हजार ६०० ते २ हजार ६५० रुपये असणारा दर साखर आयातीची घटना उघडकीस येताच २ हजार ४०० ते २ हजार ५५० रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत.

साखर निर्यात हा तुटीचा सौदा

महाराष्ट्रात २०१७-१८ च्या गळीत हंगामामध्ये विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या गळीत हंगामातील साखर शिल्लक असताना पुन्हा त्यामध्ये ही भर पडली असून साखर निर्यातीसाठी केंद्र शासनाने कारखान्यांना कोटा निश्चित करून दिला असला, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर १ हजार ९०० ते २ हजार २०० पर्यंत खाली असल्याने साखर निर्यात हा तुटीचा सौदा ठरणारा असल्याने निर्यातीला अनुदान मागणी केली जात आहे.

First Published on May 17, 2018 3:08 am

Web Title: after the sugar jaggery prices drop