”हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता बीएमसी तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरीत्या घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे” असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज(रविवारी) दिले आहेत.

मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-आढावा घेतला. उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते. दरडग्रस्त भाग, मोडकळीस आलेल्या इमारतींकडे लक्ष ठेवा; मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसाठी उपाययोजना करा. असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Mumbai Rains Alert : मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी तीन तास धोक्याचे; हवामान विभागाने दिला इशारा

मागील तीन-चार दिवसांपासून मुंबईत मुक्काम ठोकलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून रौद्र रुप धारण केलं. रात्रभर झालेल्या पावसाने मुंबईत हाहाकार उडाला. मुंबई शहर आणि उपनगरांत सगळीकडे पाणीच पाणी झालं. मुंबईतील सखल भागात पाणी साचलं. तसेच अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, रविवारी दुपारी पावसाचा जोर कमी झाल्यानं पावसाचं पाणी ओसरलं. मात्र, चार वाजेनंतर पुन्हा पावसाने जोर पकडला असून, हवामान विभागाने मुंबईसह चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.