मंदार लोहोकरे

करोना आला आणि ‘त्या’ माऊलीला विठ्ठलाचे नित्य दर्शन बंद झाले. अगदी शेवटच्या आठ महिन्यांपूर्वी पंढरीत आल्यावरही बंद झालेले मंदिरच पाहावे लागले. मग त्या माऊलीने चक्क पंढरीकडे धावणाऱ्या एसटी बसवरील विठ्ठलाच्या चित्रावर माथा टेकवला. तिचे हे छायाचित्र ‘समाजमाध्यमा’वरून प्रसारित झाले. पुढे मंदिर आणि दर्शन सुरू झाल्याचे समजताच त्यांनी पुन्हा पंढरी गाठली, पण आता पूर्वनोंदणीची अट आडवी आली. विठुदर्शनाविना रडवेली झालेली ती इथेच दुकानापुढे हतबल होत बसली. तिची ही व्यथा दुकानदारांकडून थेट मंदिर समितीपर्यंत पोहोचली आणि भक्ताच्या हाकेला विठ्ठल धावला. समितीने त्यांना विठुरायाचे दर्शन तर घडवलेच; पण साडीचोळी देत सत्कारही केला.

सईबाई प्रकाश बंडगर (रा. रामहिंग ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे या माऊलीचे नाव. प्रत्येक वारीला पंढरीत येत विठुरायाचे दर्शन घेण्याचा त्यांचा नियम आजवर कधी चुकला नाही; परंतु करोनाची साथ अवतरली आणि त्यांच्या या दर्शनात पहिल्यांदाच खंड पडला.

करोना आल्यावर अन्य सर्व मंदिरांबरोबरच विठ्ठलाचे मंदिर आणि दर्शनही बंद झाले. याच सुरुवातीच्या काळात आठ महिन्यांपूर्वी जेव्हा सईबाई इथे आल्या, त्या वेळी त्यांना मंदिराची ही बंद झालेली दारेच पाहावी लागली. विठुरायाच्या दर्शनाविनारीत्या डोळय़ांनी परत फिरलेल्या या माऊलीला एसटी स्थानकावरच एका एसटीवर त्या सावळय़ा हरीचे चित्र दिसले. तिने तिथेच माथा टेकवला आणि आपला नमस्कार सांगितला. तिच्या भक्तीचा हा क्षण कुणी तरी टिपला आणि हे छायाचित्र पुढे ‘समाजमाध्यमा’वर मोठय़ा प्रमाणात प्रसारित झाले. माऊलीच्या या रूपातूनच अनेकांनी विठ्ठलाला नमस्कार केला.  दिवाळीनंतर मंदिरे पुन्हा सुरू झाली. त्यांनी सोमवारी पुन्हा पंढरीची वाट धरली;  मंदिरात पोहोचल्यावर त्यांच्या दर्शनात पूर्वनोंदणीची अट आडवी आली. दर्शनाअभावी भरल्या डोळय़ांनी त्या मंदिराबाहेर एका दुकानाच्या पुढय़ात बसल्या.

त्यांची ही अवस्था, दु:ख भोवतीच्या दुकानदारांनी जाणले. ही व्यथा येथील रामकृष्ण वीर महाराजांपर्यंत पोहोचली. त्यांनी ती थेट मंदिर समितीपर्यंत पोहोचवली.

भक्तीची ही ओढ पाहून समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि अन्य पदाधिकारीही सद्गतीत झाले. नियम बाजूला करत त्या माऊलीच्या दर्शनाची सोय करण्यात आली. तब्बल आठ महिन्यांनंतर त्या सावळय़ा हरीचे दर्शन होणार असे समजताच ती माऊली आनंदाने हरखून गेली. ‘त्याच्या’ पायावर माथा टेकेपर्यंत तर तिच्या डोळय़ांतून आनंदाश्रू वाहू लागले.

कधी बीजंला त्याचं दर्सन घडलं व्हतं. लई ओढ लागली व्हती. त्यो कसला रोग आला आन् पांडुरंगाला आमच्यापास्न दूर केलं. आज परत पंढरीत येत दर्सनाबिगर जायचं म्हटल्यावर रडूच कोसळलं व्हतं.. पण देव भेटला आणि समद्या आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटलं!

– सईबाई प्रकाश बंडगर