पाणीटंचाई पाठोपाठ राज्यावर वीजटंचाईचे संकट ओढवले असून पाणी, गॅस व कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे दिली. पाण्याअभावी कोयना तर गॅसअभावी दाभोळ प्रकल्पात वीजनिर्मितीचे काम बंद झाले आहे. नाशिकच्या एकलहरा केंद्रात १४ दिवस पुरेल, इतकाच कोळसा शिल्लक आहे. यामुळे पाणी व विजेचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीनंतर पवार बोलत होते. नाशिक विभागात सध्या ४६९ टँकरने पाणी पुरविले जात असून अहमदनगर जिल्ह्य़ात ही संख्या सर्वाधिक आहे. पाऊस लांबल्याने पेरण्यांचे प्रमाण शून्य टक्के आहे. चाराही काही ठिकाणी जुलै व ऑगस्टपर्यंत उपलब्ध राहील, असे पवार यांनी सांगितले. आतापर्यंत विभागात केवळ २७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असला तरी नाशिक महापालिकेचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप पवार यांनी केला. यामुळे २५ कोटी रुपयांची कामे रखडली आहेत. सिंहस्थ निधीसाठी केंद्र शासन आणि महापालिकेने काही जबाबदारी उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सिंहस्थाच्या निमित्ताने पाटबंधारे विभागामार्फत गोदावरीच्या प्रवाहात नव्या घाटाचे बांधकाम करून अवरोध करण्याचे काम केले जात आहे. या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना पवार यांनी घाट बांधकामाचे समर्थन करत नदीच्या मूळ प्रवाहाला अवरोध होणार नसल्याचे सांगितले.