X

‘कोल्हाटय़ाचं पोर’वर बंदीची पुन्हा मागणी

दिवंगत डॉ. किशोर शांताबाई काळे यांनी २५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘कोल्हाटय़ाचं पोर’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी कोल्हाटी समाजाने ठरावाच्या माध्यमातून पुन्हा एकदा केली आहे.

दिवंगत डॉ. किशोर शांताबाई काळे यांनी २५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘कोल्हाटय़ाचं पोर’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी कोल्हाटी समाजाने ठरावाच्या माध्यमातून पुन्हा एकदा केली आहे. या पुस्तकामुळे कोल्हाटी समाजाची बदनामी होत असल्याचा आक्षेप घेत या प्रश्नावर प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही कोल्हाटी समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीतून देण्यात आला.

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंब (ता. माढा) या लावणी लोककलेसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात कोल्हाटी समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या वेळी डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या ‘कोल्हाटय़ाचं पोर’ या गाजलेल्या पुस्तकाबद्दल पुन्हा एकदा ओरड झाली. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी या समाजातील काही मंडळींनी मागील काही वर्षांपासून सातत्याने लावून धरली आहे. परंतु त्याची दखल कोणत्याही पातळीवर घेतली गेली नाही.

सोलापूर जिल्ह्य़ाच्या करमाळा तालुक्यातील नेर्ले येथील मूळ राहणारे डॉ. किशोर काळे यांनी आपल्या पुस्तकातून कोल्हाटी समाजातील दाहकतेचे वास्तव दर्शन घडविले आहे. विशेषत: धनदांडग्या राजकारणी मंडळींकडून कोल्हाटी समाजातील लावणी कलावंतांचे होणारे शोषण व उपेक्षा या पुस्तकात अधोरेखित झाली आहे. या पुस्तकाला मराठी साहित्यातील प्रतिष्ठेच्या ‘भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कारा’सह अन्य काही पुरस्कार लाभले आहेत.

तथापि, या पुस्तकामुळे कोल्हाटी समाजाची बदनामी होते, असा सूर काढून त्या विरोधात काही मंडळींनी भूमिका घेतली असता त्याचा उपयोग झाला नाही. या पाश्र्वभूमीवर आता पुन्हा मोडनिंब येथे झालेल्या समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत ‘कोल्हाटय़ाचं पोर’च्या विरोधात चर्चा झडली. या वेळी समाज संघटनेचे अध्यक्ष भानुदास काळे, सचिव अरुण मुसळे यांच्यासह दिलीप काळे (बारामती), सुरेखा पवार (सणसवाडी), राजश्री जामखेडकर, वैशाली नगरकर, वत्सलाबाई काळे (नेर्ले), सुशीलाबाई यादव (भूम), केशरबाई घाडगे (मोडनिंब), भगवान जठार (नगर) आदींसह समाजातील सुशिक्षित वर्ग उपस्थित होता. यात प्राध्यापक, वकील, अभियंत्यांचा समावेश होता.

पूर्वी कोल्हाटी समाजातील तरुणींचे लग्न न करता त्यांना नृत्यकलेसाठी तमाशा किंवा लोकनाटय़ कलाकेंद्रात पाठविले जात असत. परंतु आता त्यात हळूहळू परिवर्तन होत असून या समाजातही शिक्षणाचे वारे वाहू लागल्यामुळे तरुणींनी शिक्षणाची कास धरत नृत्यकलेकडे पाठ फिरविणे पसंत केले आहे, असा दावा  या बैठकीत करण्यात आला.

दरम्यान, दिवंगत डॉ. किशोर काळे यांच्या वृद्ध मातोश्री शांताबाई काळे यांनी आपल्या मुलाच्या आत्मकथा असलेल्या ‘कोल्हाटय़ाचं पोर’चे समर्थन केले आहे. सध्या किशोर हयात नसला, तरी त्याचे पुस्तकच आपल्या जगण्याचे एकमेव साधन असल्याची भावनाही शांताबाईंनी व्यक्त केली.

  • Tags: ban, demand, dr-kishor-shantabai-kale, kolhatyache-por,