इजा-बिजा-तिजा झाल्यानंतर तरी दुष्काळाचे संकट यंदा दूर होईल, अशी आशा लावून बसलेल्या बळिराजावर पावसाची चौथ्या वर्षीही  खप्पा मर्जी झाल्यामुळे पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे दुष्काळाची छाया गडद झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी थोडय़ा-फार पावसावर पुढील पावसाच्या आशेने पेरणी केली, त्यांना दुबार पेरणी करणे अटळ बनले आहे. सध्या उन्हाळय़ासारखेच वातावरण तयार झाल्याने काही प्रमाणात पडलेल्या पावसानंतर उगवलेले शेतातील तण काढण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क उन्हाळ्याप्रमाणे काम सुरू केले आहे.
मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. १२ जूनपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. जळकोट व उदगीर या दोन तालुक्यात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी चाढय़ावर मूठ धरण्याचे धाडस केले. रेणापूर तालुक्यातील पानगाव परिसर, औसा तालुक्यातील लामजना, बेलकुंड, मातोळा शिवार, निलंगा तालुक्यातील हरगरा, औराद शहाजनी, कासार बालकुंदा, देवणी, वलांडी भागात शेतकऱ्यांनी ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक पेरण्या केल्या. जिल्हय़ात पेरणीची सरासरी ३७ टक्क्यांपर्यंत पोहोचली. यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन व तुरीचे आहे.
परंतु १२ जूननंतर तब्बल तीन-साडेतीन आठवडे पाऊस गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढू लागली आहे. ज्यांनी पेरण्या केल्या नाहीत, त्यांना आता पेरणी केव्हा होईल याची चिंता आहे, तर ज्यांनी धाडस करून पेरणी केली त्यांना दुबार पेरणीसाठी अवसान कुठून आणायचे, या चिंतेने ग्रासले आहे. लवकर व चांगला पाऊस झाला, तरच दुबार पेरणी शक्य आहे. मात्र, पेरणीयोग्य पाऊस पडणार की नाही, ही चिंता कायम आहे. गतवर्षी ५५ टक्केच पाऊस झाल्यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला. या प्रश्नातून या वर्षी तरी सुटका होईल,अशी आशा होती. दुर्दैवाने विक्रम-वेताळाच्या कथेप्रमाणे शेतकऱ्यांच्या डोक्यावर तेच प्रश्न पुन्हा पुन्हा चढून बसत आहेत.
जिल्हय़ाची पावसाची सरासरी ८७ मिमी असली, तरी ती सरसकट नाही. शिरूर अनंतपाळ, निलंगा तालुक्यांची सरासरी कमी आहे. अहमदपूर तालुक्यातील किनवट मंडळात केवळ ४० मिमी पाऊस झाला. यापूर्वी झालेल्या पावसाच्या आकडेवारीचा पेरणीसाठी काही उपयोग होणार नाही. नव्याने १०० मिमी पाऊस पडला, तरच पेरणी करता येणार आहे. हवामान खात्याने जुल व ऑगस्ट महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे भाकीत वर्तविल्याने शेतकऱ्यांचा घोर आणखी वाढला आहे.
हवामान आधारित पीकविमा भरण्यासाठी सरकारने ३० जून ही शेवटची तारीख जाहीर केली आहे. पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. गतवर्षी हवामान आधारित पीकविमा योजनेने शेतकऱ्यांना चांगलाच झटका दिला. शिवाय या वर्षी नव्याने सरकारने सक्ती केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी मोठी नाराजी आहे.